Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड बसस्थानक परिसरात पिस्तुलासह युवकाला अटक
ऐक्य समूह
Friday, October 12, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि.11: येथील कराड बसस्थानक परिसरात पिस्तूल घेवून फिरणार्‍या सागर सदाशिव नलावडे (वय-20 वर्षे), रा. देशमुखमळा, पार्ले,ता. कराड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून पिस्तूल जप्त केल्याची कारवाई बुधवारी रात्री केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कराड बसस्थानक परिसरात एक युवक पिस्तूल घेवून फिरत असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून  त्यांनी बुधवारी रात्री बसस्थानक परिसरात सापळा रचला. त्यावेळी गस्त घालणार्‍या पोलिसांना एक युवक संशयीतरीत्या फिरताना दिसला. त्याच्याकडे पथकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व तो पळून जाऊ लागला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल सापडले.    
पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपली ओळख सांगून सागर नलावडे असे नाव असल्याचे सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पिस्तूल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला कराड पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर संशयित युवकाकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलीस हवालदार प्रवीण फडतरे, शरद बेबले, निलेश काटकर, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, मयुर देशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: