Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
2019 ला पुन्हा सत्तेवर आलो तर सगळ्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलू : अमित शहा
ऐक्य समूह
Monday, October 29, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: na3
5हैदराबाद, दि. 28 (वृत्तसंस्था) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबाद येथे आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर येऊ द्या काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व घुसखोरांना बाहेर काढू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
 हैदराबाद येथे आयोजित ‘युवा महाअधिवेशन विजय लक्ष्य 2019’ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा पराभव आणि भाजपला वाढत चाललेला जनाधार यावर चर्चा केली. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
आसाममध्ये नॅशनल सिटिजन रजिस्टरबाबत बोलताना ते म्हणाले, भाजपने एनआरसी आणले आणि 40 लाख घुसखोर निश्‍चित केले. हे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रकरण आहे. याबाबत आम्ही कधीच समझोता करणार नाही. यावेळी त्यांनी हैदराबादमधील प्रभावी नेते ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. ओवेसी यांच्या भीतीपोटी तेलंगणातील केसीआर सरकारने हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस साजरा करण्याचे सोडून दिल्याचा आरोप केला. हैदराबाद येथेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सिंहनाद केला होता. त्यामुळे भारत एकसंध राहिला आणि निजामाला पळून जाण्यास भाग पडले.
राहुलबाबा आम्ही तुम्हाला साडेचार वर्षांचा हिशोब देणार नाही. कारण तुम्हाला हिशोब मागण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने चार पिढीपर्यंत राज्य केले पण गरिबांसाठी काहीच केले नाही. राहुलबाबा तुमच्या पक्षाला तर दुर्बिण घेऊन शोधावे लागते. एकीकडे पंतप्रधान मोदी मेक इन इंडिया करत आहेत तर दुसरीकडे महाआघाडी ब्रेकिंग इंडियामध्ये व्यस्त आहे. या महाआघाडीला कोणता नेता नाही, निती नाही किंवा आदर्शही नाही, असा टोला त्यांनी लगावला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: