Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे अनावरण
ऐक्य समूह
Thursday, November 01, 2018 AT 11:50 AM (IST)
Tags: na3
सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा
5केवाडिया, दि. 31 (वृत्तसंस्था) : स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळ दाबून अनावरण केले. सरदार पटेल यांच्या 143 व्या जयंतीचे औचित्य साधून 182 मीटर उंचीच्या या पुतळ्याचे लोकार्पण झाले. सरदार पटेल यांना भारताचे ‘पोलादीपुरुष’ असे संबोधले जाते. त्याचेच प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेला हा ब्राँझचा पुतळा गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी केवाडिया येथे उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रीय शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल  यांचे योगदान फार मोठे आहे तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुषही म्हटलं जातं आज लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण याच मुद्द्यांवर केंद्रित असेल. ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोहपुरुषा’च्या प्रतिमेजवळ जाऊन त्यांच्या चरणी पुष्पांजली अर्पण केली. सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रध्वजाचे तीन रंग असलेले फुगे आकाशात सोडण्यात आले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशावर येणार्‍या प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र रहायचे आहे. सरदार पटेल म्हणायचे, की प्रत्येक भारतीयाला आपली जात विसरून केवळ आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवायला लागेल. त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केवळ भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण नाही तर भारताचे अस्तित्व नाकारू इच्छिणार्‍यांना प्रत्युत्तर आहे. भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन सरदार पटेलांचे हे स्मारक घडवत आहे. हे स्मारक म्हणजे भारताच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा अद्भुत नमुना आहे.
सरदारांच्या दृढ संकल्पामुळे आपण आज देशभरात मुक्तपणे फिरू शकतो. क्षणभर विचार करा, की पटेलांनी देशाच्या एकतेचा संकल्प केला नसता तर आज गिरचे सिंह, सोमनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि हैद्राबादमधील चारमिनार पाहण्यासाठी आपल्याला व्हिसा घ्यावा लागला असता. पटेलांमध्ये कौटिल्याची कूटनीती आणि शिवाजी महाराजांचे शौर्य होते. आपल्या अंतर्गत भांडणांमुळे आपल्याला गुलामगिरीत रहावे लागले होते. आता आपल्याला आपापसांत लढायचे नसून एक व्हायचे आहे, हे त्यांनी सांगितले. त्यांच्या या नीतीमुळेच सर्व संस्थाने भारतात सामील होऊन आपला देश एक झाला. त्यासाठी सर्व राजांनी केलेला त्याग आपल्याला विसरता येणार नाही.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
मराठी भाषेचा विसर
या भव्य पुतळ्याखाली एका पांढर्‍या रंगाच्या पाटीवर देशी-विदेशी भाषांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे लिहिले आहे. त्यात विविध भारतीय भाषांचाही समावेश आहे. मात्र, त्यात मराठी भाषेचा विसर पडला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन शेजारी राज्ये असूनही गुजरातच्या प्रशासनाने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुतळ्याच्या उभारणीत एका मराठमोळ्या शिल्पकाराने महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या भाषणात मोदींनी सरदार पटेलांचे गुणगान करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा उल्लेख केला. मात्र, प्रत्यक्षात येथे मराठी भाषेचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: