Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर औटी यांचे विंचुर्णी येथे निधन
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:50 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 4 : भारतीय सैन्यदलातील निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर प्रल्हाद औटी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी वृध्दापकाळाने विंचुर्णी, ता. फलटण येथील राहत्या घरी शनिवारी रात्री निधन झाले. रविवारी दुपारी 12.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर विंचुर्णी येथे त्यांच्या शेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी भारतीय सैन्य दलातील निवृत्त कर्नल अमरसिंह पाटणकर, सुबोधकुमार जगदाळे, नौदलामधील निवृत्त अधिकारी भगवान दीक्षित, तहसीलदार विजय पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, कृषितज्ञ आर. व्ही. निंबाळकर, डॉ. जे. टी. पोळ, विंचुर्णीचे सरपंच रणजित निंबाळकर, क्रेडाईचे अध्यक्ष आर्किटेक्ट महेंद्र जाधव, सौ. चंदा जाधव, डॉ. मंजिरी निंबकर, डॉ. चंदा निंबकर, डॉ. राजवंशी, अमिरखान मेटकरी, निवृत्त नौदल अधिकारी जे. एस. काकडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि औटी कुटुंबीय उपस्थित होते.
दि. 7 सप्टेंबर 1927 रोजी जन्मलेले व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर औटी यांची 1945 मध्ये रॉयल इंडियन नेव्ही (आरआयएन) मध्ये निवड झाली. त्यानंतर डार्टसमाऊथ आणि ग्रीनवीच येथील रॉयल नेव्हल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेवून ब्रिटिश मेडिटेल फ्लिट आणि नेव्हल स्पेशालिस्ट स्कूल येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर मार्च 1950 मध्ये भारतीय नौदलात सक्रिय सेवेसाठी ते भारतात परतले. सिग्नल कम्युनिकेशनमध्ये एक विशेषज्ञ, आयएन शीप रणजित, वेंडरुट्टी, दिल्ली आणि किष्टना येथे काम केल्यानंतर शिप्स बेटवा, तीर आणि म्हैसूर या बोटीवर त्यांनी काम केले. 1971 च्या बांग्लादेश युद्धादरम्यान आयएनएस कमोरोटाच्या कमांडिग ऑफिसर म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्या युद्धातील पराक्रमासाठी त्यांना वीरचक्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर
राष्ट्रीय संरक्षण अ‍ॅकॅडमीच्या (एनडीए) कमांडंट तसेच नेव्हल मुख्यालयात आणि ध्वज अधिकारी कमांडिंग येथे कार्मिक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या सुमारे 33 वर्षांच्या सेवाकाळात
त्यांनी उत्तम काम केल्याने त्यांना परम विशिष्ट सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. 1982 मध्ये एशियन गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले. डॉ. सलीम अली या पक्षी तज्ञांसमवेत त्याचप्रमाणे पर्यावरण विज्ञान तसेच वाघ/सिंहाच्या संरक्षणासाठीही त्यांनी विशेष काम केले. या विषयावरील काही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.
सेवानिवृत्तीनंतर भारतातील समुद्री इतिहास संस्थेची संकल्पना आणि स्थापना त्यांनी केली. ही एक अद्वितीय संस्था आज देशातील सर्व समुद्री संस्थान टिकवून ठेवते त्याचप्रमाणे ऑगस्ट 2009 ते मे 2010 दरम्यान त्यांनी सागर परिक्रमा केली. त्यावेळी भारतीय नौदलातील तरुण अधिकारी महिलांना या परिक्रमेत सहभागी करुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
सेवानिवृत्तीनंतरच्या सुमारे 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत फलटण शहर व तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रमात सहभागी होवून तेथील सर्वसामान्यांना, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विशेषत: भारतीय सैन्य दलाविषयी माहिती देवून देशभावना रुजविण्याचे उत्तम काम त्यांनी केले.  येथील वास्तव्यादरम्यान वृध्दापकालीन शरीर प्रकृती सांभाळताना नियमित वैद्यकीय तपासणी त्यांनी सतत करुन घेतली. त्यासाठी येथील निकोप हॉस्पिटलचे डॉ. जे. टी. पोळ, डॉ. तेजस भगत व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची विशेष काळजी घेतली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: