Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभा निवडणुकीपूर्वी मेगा भरती
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या विरोधकांना केंद्र सरकारने तोंडघशी पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या तीन-चार महिन्यात दोन लाख पदांची भरती करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरतीचा बार उडवून देण्याची केंद्राने खेळी खेळल्याने विरोधकांच्या तंबूमध्ये बराट पसरली आहे.
रोजगाराच्या मुद्द्यावरून चीनशी भारताची तुलना करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला सतत घेरण्याचा प्रयत्न केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रोजगाराच्या मुद्द्यावरच भर  देण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. शिवाय काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातही हा मुद्दा घेण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसच्या या मुद्द्यातील हवा काढून घेण्यासाठीच दोन लाख पदांची भरती करण्यास मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वेत 90 हजार पदांची भरती
रेल्वेत 90 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. 64, 371 विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील 5,88,605 उत्तीर्ण विद्यार्थ्यांची शनिवारी यादी जारी करण्यात आली आहे. हे विद्यार्थी आता 12 ते 14 डिसेंबर दरम्यान दुसर्‍या टप्प्यासाठी परीक्षा देणार आहेत.
पॅरामिलिट्रीत 54 हजार पदे
पॅरामिलिट्रीत 54 हजार पदांची भरती करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात आढावा घेतला होता. ही भरती करण्यासाठी लवकरच एक सूत्र तयार करण्यात येणार आहे. नोकर भरतीबाबतचे नोटीफिकेशन्स याच महिन्यात जारी करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक 21 हजार पदे सीआरपीएफमध्ये तर बीएसएफमध्ये 16 हजार पदे रिक्त आहेत.
एसएससीमध्ये 40 हजार पदांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशननेही मार्च पूर्वीच 40 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. सी आणि डी वर्गातील ही पदे आहेत. मात्र नोकरभरती घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे लक्ष लागले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: