Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरताळे येथे जमिनीच्या वादातून परस्पर विरोधी दरोड्याचे गुन्हे
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: re2
सहा जणांना पोलीस कोठडी
5कुडाळ, दि. 5 : सरताळे, ता. जावली येथे जमिनीच्या वादातून परस्परविरोधी दरोड्याचे गुन्हे मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या प्रकरणी न्यायालयाने सहा जणांना दि. 8 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रूपेश नारायण काळे हे सरताळे येथील आपल्या गुरांच्या गोठ्यात गुरांना चारा घालत असताना  कालिदास गोजाबा काळे, रा. सरताळे व बापूसाहेब ज्ञानदेव मानकुमरे रा. मुंबई हे त्यांच्या आठ ते दहा साथीदारांसह डस्टर गाडी नं. एम. एच.46 झेड 7611 मधून आले व शिवीगाळ करू लागले. त्यावेळी रूपेश याचे आई-वडील सोडवण्यासाठी आले असता त्यांना व रूपेश यांना संबंधितांनी हाताने मारहाण केली. या झटापटीत रूपेश यांच्या आईचे गळ्यातील मंगळसूत्र पडले तसेच रूपेश यांच्या पत्नीला गोठ्यातून बाहेर ओढून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यातील एकजण रूपेश याच्या घरातील कपाटामधून तीस हजार रुपये घेऊन पळून गेल्याची तक्रार रूपेश काळे यांनी पोलिसात दिली असून संबंधितांवर गुन्हा नोंद झाला आहे.
दि. 4 नोव्हेंबर रोजी कालिदास काळे आपल्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करत असताना नारायण विठ्ठल काळे, मंदा नारायण काळे, रूपेश नारायण काळे, दत्तात्रय नारायण काळे व मयूर शिंदे, रा. सर्व सरताळे यांनी तेथे येऊन आमची जमीन का फणलीस, पुन्हा या शेतात पाय टाकलास तर पाय काढून हातात देईन, अशी धमकी दिली व कालिदास यास मारहाण केली. यावेळी त्यांचे मेहुणे बापूसाहेब मानकुमरे, अमरसिंह गोविंद रावत व ओमप्रकाश पांडे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना हाताने मारहाण केली.
 बापूसाहेब मानकुमरे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची चेन, दत्तात्रय काळे व रूपेश काळे घेऊन पळून गेले व मयूर शिंदे याने मानकुमरे यांच्या हाताच्या बोटातून अर्धा अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या हिसकावून काढून घेऊन पळून गेल्याची तक्रार कालिदास काळे यांनी पोलिसात दिली असून संबंधितांवर गुन्हा नोंद झाला आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि. 8 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सपोनि. जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: