Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ठोसेघर येथे चित्रीकरणादरम्यान डान्सरचा मृत्यू
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lo3
हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू : वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप
5सातारा, दि. 5 : ठोसेघर येथील पठारावर सुरू असणार्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सोमवारी दुपारी ओ. एम. सर्वनन (वय 40,रा. त्रिची,चेन्नई) या डान्सरचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकार्‍यांनी वर्तवला आहे. योग्य वेळात उपचार न केल्यानेच सर्वनन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यासोबत असणार्‍यांनी केला आहे. झाल्या प्रकारामुळे मृताच्या सोबतचे सर्व जण संतप्त झाल्याने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आठवड्यापासून चेन्नई परिसरातील पन्नासहून अधिकजण ‘विश्‍वम’ या कन्नड व तामिळ भाषेतील चित्रपटाचे चित्रीकरण सातारा परिसरात सुरू आहे. रविवारी त्या सर्वांनी मेढा परिसरात चित्रपटातील गाण्यांचे काही भाग चित्रित केले. ही गाणी ओ. एम.सर्वनन या डान्स मास्टरच्या देखरेखीखाली तयार करण्यात येत होती. सोमवारी त्यापैकी काही गाणी ठोसेघर परिसरात चित्रित करण्यात येत होती.   
चित्रीकरण सुरू असतानाच सर्वनन यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याकडे दुर्लक्ष करत सर्वनन यांनी गाण्यांचे चित्रीकरण सुरूच ठेवले. दुपारच्या सुमारास सर्वनन यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार सोबत असणार्‍यांकडे केली.
त्यामुळे त्यांना रुग्णवाहिणीतून आणून  उपचारासाठी क्रांतिसिंह
नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते मृत झाल्याचे
समजताच शूटिंग थांबवून ठोसेघर येथील सर्वजण रुग्णालयात दाखल झाले. दाखल केल्यानंतर तातडीने सर्वनन यांच्यावर उपचार सुरू करणे आवश्यक होते. मात्र त्या ठिकाणी असणार्‍या डॉक्टरांनी तसे केले नाही,  वेळकाढूपणा केला. त्यामुळेच सर्वनन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप काही जणांनी केला.
 त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्यांनी माहिती घेत सर्वनन यांच्यासोबत असणार्‍यांची चर्चा करत कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत सर्वनन यांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: