Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला दणका
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: mn1
5कर्नाटक, दि. 6 (वृत्तसेवा) : कर्नाटकमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीने भाजपाला धक्का देत मोठे यश मिळवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मांड्या लोकसभा आणि रामानागरम विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे. या विजयानंतर काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपला केवळ शिमोगा या एकमेव लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला.
कर्नाटकमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात 67 टक्के मतदान झाले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा होती. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
रामानगरम विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी 1 लाख 9 हजार 137 मतांनी विजयी झाल्या आहेत. अनित कुमारस्वामी यांना 1 लाख 25 हजार 43 मते तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराला फक्त 15 हजार 906 मते मिळाली. अनिता मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.
जमाखांडी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आनंद एस नयामगौडा 39,480 मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यांना 96 हजार 968 मते मिळाली तर भाजपचे उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांना 57,492 मते मिळाली.
बल्लारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार व्ही.एस.उगरप्पा यांनी भाजपच्या जे. शांता यांच्यावर तब्बल 2 लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला. 2004 पासून ही जागा भाजपकडे होती. खाण सम्राट रेड्डी बंधूंचे विश्‍वासू सहकारी श्रीरामुलू यांची बल्लारीवरील पकड संपत चालल्याचे हे लक्षण आहे. विभधानसभा निवडणुकीतही भाजपला इथे मोठ फटका बसला होता.
शिमोगा लोकसभा मतदारसंघात येडियुरप्पा यांचे सुपुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी जागा कायम राखली. प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे इथे निवडणूक झाली. त्यांनी जेडीएस उमेदवार मधू बंगरप्पा यांचा 50 हजार मतांनी पराभव केला.
मांड्या लोकसभा मतदारसंघात शिवराम गौडा यांनी सोपा विजय मिळवला. काँग्रेस-जेडीएसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. सिद्धारामय्या यांना दोन लाखापेक्षा जास्त मते मिळाली. वोक्कालिंगाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात इतकी मते मिळवणे ही भाजपसाठी जमेची बाजू आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: