Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुयाचीवाडी येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: re2
5उंब्रज, दि. 6 : उंब्रज, ता. कराड जवळ असलेल्या भुयाचीवाडी गावच्या हद्दीत  पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर  एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या लेनवर झालेल्या अपघातात दिवाळीसाठी घरी निघालेल्या मोटरसायकलस्वाराचा जागीच अंत झाला तर एक जण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी घडला. अमित दौलतराव माने (वय 24, रा.डोंगरवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर नीलेश शिवाजी पवार (वय 24, रा. कुची, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) असे जखमी युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर दुपारी अडीचच्या सुमारास भुयाचीवाडी गावच्या हद्दीत कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेला पुणे जिल्हा दूध संघ, कात्रज च्या टँकरला (क्र. एम. एच. 16 एई 7741) भुयाचीवाडी  गावच्या हद्दीत पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने (क्र. एम. एच. 47 वाय 0308) चुकीच्या बाजूने ओलांडून जाण्याच्या नादात  जोराची धडक दिली. यामध्ये टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन पलटी झाली.  या अपघातात टँकरमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुधाचा टँकर महामार्गावर रिकामा झाला.
यावेळी घटनास्थळावरून शिवशाही बस चालकाने पलायन केले. त्यास सातारा येथून बस स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन उंब्रज पोलीस ठाण्यात आणले. याच दरम्यान महामार्गाच्या पूर्व बाजूला सातारा-कराड लेनवर हा अपघात बघण्याच्या नादात सातार्‍याहून कराड दिशेकडे निघालेले अज्ञात वाहन अचानक थांबल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीची (क्र. एम. एच. 35 क्यू 1611) धडक बसल्याने दुचाकीवर मागे बसलेला युवक अमित माने हा महामार्गावर पडला. याच दरम्यान पाठीमागून आलेल्या आयशर टेंपोखाली सापडून तो जागीच ठार झाला तर मोटारसायकलस्वार नीलेश पवार हा किरकोळ जखमी झाला. अपघाताची भीषणता व या अपघातात आपला सहकारी जागीच ठार झाल्याचा धक्का त्याला बसला. घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी तसेच महामार्ग देखभालच्या कर्मचार्‍यांनी धाव घेऊन ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. अमित माने आणि नीलेश पवार हे दोघे पुणे येथे नोकरीस असून ते दिवाळीसाठी गावाकडे निघाले होते. याचदरम्यान अमित याच्यावर काळाने घाला घातला.
    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: