Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोंडारवाडी धरण मंजुरीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आक्रमक
ऐक्य समूह
Wednesday, November 28, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 27 : जावली तालुक्यातील महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देवून धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या प्रमुख मागणीसह सातारा तालुक्यातील लावंघर उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावावे आणि उरमोडी धरण प्रकल्पाच्या सातारा तालुक्यातील कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, या मागण्यांसाठी आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लक्षवेधी वेशभूषा करुन विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन केले. दरम्यान, सरकारने मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणातील पाणी खाली जावू देणार नाही, असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
डोंगराळ आणि टंचाईग्रस्त जावली तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटावा यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. तसेच लावंघर व परळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लावंघर उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचे काम सुरु करण्यासाठी आणि उरमोडी धरणातून सातारा तालुक्यात सिंचनासाठी सुरु असलेली कालव्यांची कामे पूर्ण व्हावीत, यासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र राज्य सरकार आणि शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाचे डोळे उघडण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत विधानभवनाच्या समोर तीव्र आणि अनोखे आंदोलन केले. 
मुंबईत अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यातील दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मागण्यांचा उल्लेख असलेला पोषाख परिधान करुन आणि गांधी टोपी डोक्यात घालून केलेल्या आंदोलनामुळे दिवभर या आंदोलनाचीच चर्चा रंगली.
बोंडारवाडी धरणाला मंजुरी मिळालीच पाहिजे. लावंघर उपसा सिंचन योजना झालीच पाहिजे आणि सातारा तालुक्यातील उरमोडीचे कालवे पूर्ण झालेच पाहिजेत असे लिहिलेला पोषाख आणि गांधी टोपी परिधान करुन आ. शिवेंद्रसिंहराजे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आले. या ठिकाणी घोषणाबाजी करुन त्यांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर त्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे विधानभवनात जाताना राष्ट्रवादीचे नेते आ. सुनील तटकरे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत बसून आंदोलनास पाठिंबा दिला तर आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, काँग्रेसचे आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह आ. राजेश टोपे, आ. राहुल बोंद्रे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत ठिय्या मारुन आंदोलनास पाठिंबा दिला आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजपचे माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही काहीवेळ थांबून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी आंदोलनाबाबत चर्चा केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अनोखे आंदोलन पाहून अनेक आमदारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. या कल्पक आणि अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा विधानभवनात दिवसभर सुरु होती.
या तीनही मागण्यांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र शासन आणि सरकार दुर्लक्ष करत असल्याने आज आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. काहीही झाले तरी, बोंडारवाडी धरणाला मंजुरी मिळवणार आहे आणि लावंघर उपसा सिंचन योजना व सातारा तालुक्यातील उरमोडीचे कालवे पूर्ण करणार आहे. सातारा आणि जावली तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि सिंचनासाठी हे तीनही प्रश्‍न खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या तीनही मागण्या त्वरित मान्य करुन तातडीने पुढील पावले उचलावीत अन्यथा, यापुढे आक्रमक आंदोलन केले जाईल. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी सातारा तालुक्याच्या बाहेर जावू देणार नाही, असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: