Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा आरक्षणाचे जिल्ह्यात जोरदार स्वागत
ऐक्य समूह
Friday, November 30, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 29 : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग नव्याने तयार करून 16 टक्के आरक्षण दिल्याने सातारा जिल्ह्यात विविध शहरांसह तालुक्यामध्ये मराठा समाजाने जोरदार स्वागत केले. सातारा पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर, पढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक शरद काटकर, हरीष पाटणे म्हणाले, कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाज एकत्र आला. मराठा आरक्षण हा विषय गेल्या दीड वर्षापासून जिव्हाळ्याचा बनला होता. मराठा एकसंध झाला. हे कोणत्याही राजकीय पक्षाला न परवडणारे होते. मराठा आरक्षण हे दोन, पाच, हजार लोकांनी मोर्चे काढून सुटणारा प्रश्‍न नव्हता. आरक्षणाच्या महत्त्वाच्या प्रश्‍नासाठी दुर्गम डोंगराळ भागातील ग्रामीण भागातील बळीराजासह शहरातील मराठा बांधवांनी एकीची वज्रमूठ बांधल्यामुळे लाखो शिस्तप्रिय व शांततेचे मोर्चे निघाले. नाइलाजाने सरकारला आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी लागली. आज विधेयक मंजूर झाले. भाजप-सेनेच्या सरकारला राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय, शेकाप आदी घटक राजकीय पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे मराठा समाजातील तमाम बांधवांच्यावतीने अभिनंदन करीत आहोत.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
जावलीचे माजी आ. सदाशिवराव सपकाळ म्हणाले, मराठा समाजाचा लढा यशस्वी झाला आहे. सध्या मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.     मराठा समाजासोबत धनगर समाजालाही आरक्षण मिळावे ही शिवसेनेची भूमिका आहे. न्यायालयात निश्‍चितच यश मिळेल. या लढ्यामध्ये सातारा जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. कारण छत्रपतींच्या राजधानीत 3 ऑक्टोबर रोजी निघालेल्या मोर्चाच्या वेळीच भाजप सरकारला आरक्षणाशिवाय पर्याय राहिला नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, मराठा समाजाने अर्धी लढाई जिंकली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधिमंडळ सदस्यांचे अभिनंदन. हे आरक्षण निवडणुकीपुरते नसून सर्वोच्च न्यायालयातही टिकले पाहिजे. कारण हे शाश्‍वत आरक्षण असावे. यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे राष्ट्रवादी सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आभार मानतो.  (पान 6 पहा) रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या 32 टक्के आहे. त्याचे निम्मे आरक्षण महाराष्ट्र विधिमंडळात मिळविण्यासाठी सर्वच आमदारांनी एकजूट दाखवली. रिपब्लिकन पक्षाने सातार्‍यात यासाठी जनजागृती रॅली काढली व मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे.
भाजपचे दत्ताजी थोरात म्हणाले, भाजप हा सर्व जाती-धर्माचा पक्ष आहे. आम्ही मराठा समाजातील लोक भाजपचे काम करीत आहे. आम्ही कधीही पक्ष बदलला नाही. उलट मराठा आरक्षणासाठी भाजप नेत्यांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला याचे समाधान वाटत आहे. याचे श्रेय फक्त रस्त्यावर उतरणार्‍या सर्व जाती-धर्मातील बांधवांचे आहे. आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. न्यायालयातही यश मिळेल याची आम्हाला खात्री वाटत आहे.
भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व निमिश शहा म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे होते. शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून त्यांनी सरकारचे लक्ष केंद्रित केले. भाजपच्या युती सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेसचे रवींद्र झुटिंग म्हणाले, पूर्वी मराठा समाजाची परिस्थिती सधन होती. पण वाढती महागाई, विभक्त कुटुंब पद्धती व शिक्षणाचा अभाव या गोष्टींमुळे आता मराठा समाजही आरक्षणाचा हक्कदार बनला आहे, हे सरकारच्या लक्षात आले आहे. काँग्रेस पक्षाने विधिमंडळात हा प्रश्‍न लावून धरला आहे. त्याला यश मिळाले आहे.
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा समाजातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एकेकाळी बांधावर बसून आपली बागायत शेती पहाणारे मराठा बांधव आज राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे माथाडी म्हणून शहरात जावून हमाली करीत आहेत. आरक्षणामुळे किमान सुशिक्षित मराठा समाजाला प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन.
किशोरभाऊ तपासे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाने पहिल्यापासूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका मांडली होती. त्याला यश मिळाले आहे. अर्थात यासाठी मराठा समाज रस्त्यावर आला. मराठा किंवा इतर हिंदू यांनी या मागणीला जोर लावला. पण काही संघटना मात्र यात सामील झाल्या नाहीत. तरीही त्यांचेही स्वागत करीत आहोत.
मुस्लीम समाजातील युवा नेते फिरोज पठाण म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाची खर्‍या अर्थाने गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विक्रमी मोर्चे निघाले. या मोर्चामध्ये मुस्लीम समाजाने मराठा समाजासाठी चहापान व्यवस्था करून आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश दिला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: