Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यशवंतनगर येथील मुख्याध्यापकावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: re4
5उंब्रज, दि. 2 : यशवंतनगर, ता. कराड येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांशी वारंवार अश्‍लिल वर्तन केल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी तळबीड पोलिसात दिली असून या प्रकरणी मुख्याध्यापकावर बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाराम ज्ञानदेव भुलुगडे (वय 56 रा. ताईगडेवाडी, ता. पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  यशवंतनगर येथील एका शाळेत गंगाराम भुलुगडे हा मुख्याध्यापकपदी कार्यरत आहे. गंगाराम भुलुगडे हा शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कामाची कारणे सांगून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत होता. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे व इतर प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याशी अश्‍लिल चाळे करत होता. दि.3 नोव्हेंबर रोजी शाळेला सुट्टी लागल्यानंतर शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याबाबतचे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितले. दरम्यान, नुकतीच विद्यार्थ्यांची शाळा सुरु झाल्याने पालकांनी सदर प्रकरणाबाबत शाळेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर पालकांनी सदरचा प्रकार गंभीर असल्याने याबाबत कराड पंचायत समितीच्या  गटशिक्षणाधिकार्‍यांकडे मुख्याध्यापक गंगाराम भुलुगडे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार दि.3 नोव्हेंबर पूर्वी (दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी) वेळोवेळी मुख्याध्यापक गंगाराम भुलुगडे हा शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांशी अश्‍लिल वर्तन करून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याने पालकांनी तळबीड पोलिसांत त्याच्या विरोधात शुक्रवार, दि.30 रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गंगाराम भुलुगडे यास अटक केली आहे. कराड न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सपोनि. वैशाली पाटील तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: