Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वैभव घार्गेचा खून वाळू व्यवसायातील देवाण घेवाणीतून
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re3
संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी
5उंब्रज, दि. 2 : वाळू व्यवसायातील देवाण घेवाणीवरुन पूर्वी झालेला वाद तसेच घटनेपूर्वी झालेल्या वादातून कवठे, ता. कराड येथील वैभव आनंदराव घार्गे (वय 28) याचा खून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली. खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला संशयित पवन ऊर्फ प्रवीण शामराव साळुंखे (वय 32) यास कराड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेतील अन्य एक संशयित फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. वैभव घार्गे याच्या खुनामागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या नवीन कवठे, ता.कराड येथील युवक वैभव आनंदराव घार्गे (वय 28) याचा गावातीलच दोघांनी खून केल्याचे शनिवारी उघडकीस आले. अटकेत असलेल्या संशयिताने अन्य एका साथीदाराच्या मदतीने वैभवचा गळा आवळून खून करून मृतदेह भुयाचीवाडी-कवठे, ता. कराड गावचे हद्दीत असणार्‍या कृष्णा नदीच्या बंधार्‍यात टाकल्याची घटना शनिवारी पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांना खबर्‍याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित पवन ऊर्फ प्रवीण साळुंखे यास ताब्यात घेवून घटनास्थळी मृतदेहाचा शोध घेतला. बंधार्‍याच्या पाण्यातून वैभव याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.  पवन उर्फ प्रवीण शामराव साळुंखे यास उंब्रज पोलिसांनी कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पवनचा साथीदार राजू उर्फ भिकोबा मारुती मसुगडे (रा. नवीन कवठे, ता. कराड) हा अद्याप फरार असून तपासकामी पोलीस पथके रवाना झाली आहेत.  दरम्यान, वाळूच्या पैशातील आर्थिक देवाण घेवाणीतून झालेली वादावादी तसेच पवन याच्या गाडीचा चालक राजू मसुगडे यास वैभव याने केलेली मारहाण व घटनेपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून वैभव घार्गे याचा गळा आवळून दोघांनी खून केला. नंतर मृतदेह बंधार्‍यावरील लोखंडी दरवाज्याला बांधून पाण्यात टाकल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले. वैभव घार्गेवर यापूर्वी 2016 मध्ये पुणे पोलिसात खुनाचा गुन्हा, उंब्रज पोलीस ठाण्यात 2011 पासून गंभीर मारामारी, चोरी, मारामारी, प्रतिबंधात्मक कारवाई असे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या घटनेमागे अन्य कोणाचा हात आहे का याचा तपास तसेच फरारीच्या मागावर पोलीस असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: