Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुलीवर वार करणार्‍या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: re5
5कराड, दि. 2 :  अल्पवयीन मुलीवर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या अजय सुनील गवळी (वय 23 वर्षे), रा. कराड या युवकाचा ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी मृत्यू झाला. दरम्यान, पाटण येथील रवींद्र सोनवणे याने अजयला मारहाण करुन जबरदस्तीने अ‍ॅसिड पाजून त्याची हत्या केल्याचे अजय गवळी याने लिहिलेल्या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन संंबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कराड शहर पोलिसांना अजय गवळी याच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी दिले आहे.
येथील शिवाजी स्टेडियमनजीक असलेल्या झोपडपट्टीत दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलीवर शस्त्राने वार करण्यात आलेे होते. जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जखमी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन अजय सुनील गवळी याच्यासह त्याची आई व बहिणीवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. अजयने कौटुंबिक वादातून घरात घुसून मुलीवर वार केल्याचे व त्याला आई व बहिणीने मदत   केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी अजय गवळीचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, दि. 5 नोव्हेंबर रोजी अजय गवळी हा अत्यवस्थ अवस्थेत काही नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर कराड  शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही नोंद करण्यात आला. तेव्हापासून अजयवर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत त्याचा घातपात झाल्याचा तक्रार मांडली. दरम्यान, अजय गवळी याच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देवून अजय गवळी याचा घातपात झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की अजय गवळी याने रुग्णालयात उपचार घेताना पोलिसांना अर्ज लिहून दिला आहे, की मी स्वत:हून अ‍ॅसिड पिलो नाही. परंतु, पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मला मारहाण करुन अ‍ॅसिड पाजले आहे. त्यात पाटण येथील रवींद्र सोनवणे या इसमाचे नाव आहे. तरी या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: