Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र
ऐक्य समूह
Tuesday, December 04, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: mn2
बंजारा समाजाच्या कार्यक्रमात युतीचा ‘नगारा’?
5वाशिम, दि. 3 (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच केलेला अयोध्या दौरा, मराठा आरक्षण विधेयकाचे भाजपने पाळलेले आश्‍वासन आणि आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील संभाव्य आव्हाने यांचा विचार करुन भाजप-शिवसेना यांच्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाशिम येथे सोमवारी बंजारा समाजाच्या एका कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर आले. बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य ‘नगारा’ दोन्ही नेत्यांनी एकत्र वाजवला. त्याचबरोबर भाषणांमध्ये एकमेकांची स्तुती केली. कार्यक्रमस्थळी जाताना मुख्यमंत्र्यांनी शिष्टाचाराला बगल देऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे दोन्ही युतीचा ‘नगारा’ वाजवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, मंत्री मदन येरावार, संजय राठोड, दादाजी भुसे, भावना गवळी यांच्यासह दोन्ही पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित होते. शिवसेना-भाजप यांच्यातील तणाव निवळत चालल्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धवठाकरे आणि मुख्यमंत्री अनेकदा एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र, शिवसेना आपले मुखपत्र ‘सामना’मधून सरकारवर सातत्याने तोंडसुख घेत असल्याने दोन्ही नेते एकत्र आले तरी तो सलोखा तात्पुरताच ठरत होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात थोडे वेगळेच चित्र दिसले. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनी एकमेकांची तोंडभरुन स्तुती केली. मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगत त्यांची प्रशंसा केली.
मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंसोबत प्रवास
दरम्यान, यवतमाळ येथे आज झालेल्या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास केला. प्रोटोकॉल मोडत मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ येथील ग्रीन रुमपासून कार्यक्रमस्थळापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या ‘बुलेटप्रूफ’ टाटा सफारीतून एकत्र प्रवास केला. ग्रीन रुममध्ये उद्धव ठाकरे यांना भेटायला मुख्यमंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे पोहोचल्या. कार्यक्रमस्थळी जाताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा आणि गाडी सोडून उद्धव ठाकरेंच्या गाडीत बसणे पसंत केले. ही भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
बंजारा अकादमी उभारणार
दरम्यान, पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बंजारा भाषेत भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. सेवालाल महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकासाठी उर्वरित 100 कोटी रुपये निधीची तरतूदही लवकरच करण्यात येईल. बंजारा संस्कृतीचे जतन करण्यासाठी खास अकादमी उभारण्यात येईल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बंजारा हा लढवय्या समाज आहे. या समाजाला शिक्षणाची सुविधा दिल्यास हा समाज देशाचा आधारस्तंभ होईल. संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचे नव्हते तर ते संपूर्ण जगाचे होते.
   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: