Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांना अटक
ऐक्य समूह
Tuesday, December 04, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re1
5वरकुटे-मलवडी, दि. 3 : ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे घेवून ये असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देवून मारहाण करून विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सौ. आशा किसन खरात असे दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती किसन सर्जेराव खरात, सासरा सर्जेराव रामू खरात व सासू जगुबाई सर्जेराव खरात (सर्व रा. हंडेवस्ती-काळचौंडी, ता. माण) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  बनगरवाडी, ता. माण येथील प्रल्हाद रंगनाथ बनगर यांची मुलगी आशा हिचा विवाह दि. 30 ऑक्टोबर 2008 रोजी हंडेवस्ती (काळचौंडी) येथील किसन सर्जेराव खरात याच्याबरोबर झाला. पाच वर्षे सुरळीत संसार सुरु होता. पती किसन सर्जेराव खरात याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आशा खरात हिने माहेरच्या लोकांकडे व्यक्त केला होता. तसेच आपला नवरा ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत तसेच संबंधित महिलेशी असणार्‍या संबंधातून मला मारहाण करत असल्याचे सांगितले होते. आई-वडिलांनी अनेक वेळा समजूत घालून तिला सासरी धाडले होते. आशा हिला कृष्णा (वय 7) व खुशी (वय 6) अशी दोन मुले आहेत. सासरकडील लोकांचा त्रास असह्य झाल्यामुळे आशा हिने दि. 29 नोव्हेंबर रोजी काळचौंडी हद्दीतील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
मयत आशा खरात हिचा भाऊ नितीन प्रल्हाद बनगर याने म्हसवड पोलिसात आशाचा पती, सासू, सासरे यांच्या विरोधात लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. म्हसवडचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: