Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वीकृत नगरसेवकपदी अविनाश कदम बिनविरोध
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 4 : सातारा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नगरविकास आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. दरम्यान कदम यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी पालिकेबाहेर फटाक्यांची आतषबाजी केली.
स्वीकृत नगरसेवक अतुल चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी नगरविकास आघाडीकडून अनेक मान्यवर इच्छुक होते. त्यामध्ये अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, हर्षल चिकणे, स्वप्निल माने, सनी शिंदे यांचा समावेश होता. अनुभवी आणि मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या अविनाश कदम यांच्या नावाला नविआचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पसंती दिल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी नविआकडून अविनाश कदम यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्याकडे दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी 3 वाजता पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वीकृत नगरसेवक पदासाठी अविनाश कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची अल्प उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पक्ष प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, निशांत पाटील, सौ. स्मिता घोडके यांच्यासह दोन ते तीनच नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अविनाश कदम म्हणाले, शासनाने पालिकेला दिलेल्या निधीचा वापर योग्यरित्या होतो का नाही यावर माझे लक्ष असणार आहे. सातारा विकास आघाडीने चुकीच्या पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न केल्यास नगरविकास आघाडी नागरिकांना बरोबर घेवून आंदोलन छेडणार आहे. नगरसेवकांच्या हक्काचा फंड मिळालाच पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.   अशोक मोने म्हणाले, नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला आमचा विरोधच राहील. निवडीला अमोल मोहिते यांच्यासह नविआचे नगरसेवक उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: