Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मलकापूरचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 4 : कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव पडले आहे. मंगळवारी मंत्रालयात चिठ्ठ्या टाकून काढलेल्या आरक्षण सोडतीवेळी ओबीसी महिलेसाठी हे आरक्षण पडले असल्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे ओबीसी महिला नगराध्यक्ष जनतेतून निवडली जाणार आहे. मलकापूरचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव पडल्याने अनेक इच्छुकांची मात्र निराशा झाली.
मलकापूर नगरपंचायतीचे न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपरिषदेत रूपांतर झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू केली. शहरात 9 प्रभाग पाडले असून 19 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.  नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार आहे. यासाठी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या आरक्षणात सोडतीवेळी ओबीसी महिलेसाठी मलकापूरचे नगराध्यक्षपद राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले.
राज्यातील मलकापूर व सिंदखेडराजा या दोन नगरपरिषदांच्या  नगराध्यक्षपदाची सोडत मंगळवारी मंत्रालयात झाली. त्यानुसार राज्यातील ओबीसी महिलेसाठी एक बॅकलॉग शिल्लक असल्याने चिठ्ठ्या टाकून ओबीसी महिलेबाबत आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यापैकी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी एक चिठ्ठी उचलून मलकापूरसाठी ओबीसी महिला आरक्षण पडल्याचे जाहीर केले.  सिंदखेडराजा नगरपालिकेसाठी ओपन नगराध्यक्षपद पडले. मलकापूर नगरपरिषदेला ओबीसी महिला आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे. असे असले तरी या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: