Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: na1
दलाल ख्रिस्तियन मिशेल भारताच्या ताब्यात
5दुबई, दि. 4 (वृत्तसंस्था) : भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील मुख्य दलाल ख्रिस्तियन मिशेलच्या प्रत्यार्पणाला संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर त्याला मंगळवारी रात्री दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे नेण्यात आले. तेथून विमानाने त्याची भारतात रवानगी करण्यात येत असल्याचे वृत्त खलिज टाईम्स या वृत्तपत्राने दिले आहे.
मिशेलच्या प्रत्यार्पणामुळे भारताला मोठे यश मिळाले आहे. भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी
ऑगस्टावेस्टलँड या 12 हेलिकॉप्टरचा सौदा 3600 कोटी रुपयांना ठरला होता. हा खरेदी व्यवहार वादग्रस्त ठरला होता. या घोटाळ्यातील तीन दलालांपैकी ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मिशेल (वय 54) याचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी भारताने केली होती. ती मागणी संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ न्यायालयाने मान्य केल्याने त्याला भारतात आणण्यात येत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून भारताच्या तपास यंत्रणांचे अधिकारी मिशेलला मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेले. तेथून मध्यरात्रीच त्याला भारतात आणण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.   
मिशेलला फेब्रुवारी 2017 मध्ये दुबईत अटक करण्यात आल्यापासून त्याचा मुक्काम तेथील तुरुंगातच होता. ऑगस्टावेस्टलँड खरेदी घोटाळ्याची चौकशी करणार्‍या सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. या खरेदी व्यवहारात मध्यस्थी केल्याबद्दल त्याला ऑगस्टावेस्टलँड कंपनीकडून 225 कोटी रुपयांची दलाली देण्यात आली होती, असा आरोप ‘ईडी’ने आरोपत्रात ठेवला होता. भारत सरकारने 12 हेलिकॉप्टर खरेदीचा हा व्यवहार 2013 साली रद्द केला होता. भारताने 2017 मध्ये संयुक्त अरब अमिरातीकडे मिशेलच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. त्याला तेथील कनिष्ठ न्यायालयाने मान्यता दिली होती. त्यावर मिशेलने वकिलामार्फत वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. भारत सरकारने प्रर्त्यापणासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली असून त्यांनी गृह मंत्रालयाऐवजी परराष्ट्र मंत्रालयामार्फत ही विनंती केली होती. त्यामुळे मिशेलचे प्रत्यार्पण करू नये, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला होता. मात्र, 19 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने मिशेलच्या भारताकडील प्रत्यार्पणाचा मार्ग खुला केला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: