Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करणार
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: mn2
राम मंदिरासाठी कायदा करा : उद्धव ठाकरे
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : निवडणुका आल्या, की ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा द्यायच्या आणि सत्ता आली, की गप्प बसायचे, असे धोरण असलेल्यांना आता या मुद्द्यावर प्रचार करण्याचा अधिकार उरलेला नाही. मात्र, आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. राम मंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी येत्या 24 डिसेंबरला पंढरपूर येथे जागर सभा घेणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांची बैठक आज शिवसेना भवनात झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिर आणि दुष्काळासंदर्भात शिवसेनेची भूमिका मांडली. केंद्रात सरकार येऊन चार-साडेचार वर्षे झाली तरी राम मंदिराच्या विषयावर कुणी बोलत नाही. येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुका येतील. तेव्हा आता कोर्टाकडे बोट दाखवतील. हे चालणार नाही. इतर विषयात तुम्ही कायदा करून न्यायालयाचे निर्णय फिरवत असाल तर हादेखील मुद्दा आता कायदा करूनच सोडवावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.  
राम मंदिराबाबत झोपलेल्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी अयोध्येला जाऊन आलो. एवढ्यावर हा विषय सोडणार नाही. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 24 डिसेंबरला पंढरपूरला सभा घेणार आहे. कुंभकर्ण हा केवळ रावणाच्या सैन्यात होता, असं नाही. वर्षानुवर्षे झोपणारा कुंभकर्ण सत्ता आल्यानंतर आणि पुढची निवडणूक आल्यानंतरही उठत नसेल तर या कुंभकर्णाला उठवण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. गरज लागल्यास पुढच्या टप्प्यात अन्य राज्यांमध्ये जाऊन हे काम करावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दुष्काळावर ठोस उपाययोजना आवश्यक
दुष्काळाबाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आपण घेतली. दुष्काळी परिस्थिती दिवसोंदिवस गंभीर होतेय. शिवसेना दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे. शिवसेनेने दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे काम सुरू केले आहे. आणखी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या सर्व कामांची तपशीलवार यादी तयार करायला सांगितली आहे. लवकरच पुन्हा एकदा बैठक घेऊन हे प्रश्‍न मार्गी लावले जातील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: