Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्वॅप मशीनचा वापर करून फसवणूक करणारी सहा जणांची टोळी जेरबंद
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: lo2
1 लाख 25 हजारांची रोकड जप्त
5सातारा, दि. 4 . एटीएम कार्डचा वापर करून स्वॅप मशीनचा वापर करून फसवणूक करणारी सहा जणांची टोळी जेरबंद करण्यात वाठार स्टेशन पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून विविध बँकेचे कार्ड आणि 1 लाख 32 हजार रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजय कुंभार म्हणाले, दि. 4 रोजी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वामी पेट्रोल पंपावर काही अज्ञात इसमांनी त्यांच्याकडील एटीएमचा वापर करून पेट्रोल पंपावर असणार्‍या स्वॅप मशीनद्वारे 6 हजार रुपये काढून पुन्हा स्वॅप मशिनच्या सेटिंगमधून झालेला व्यवहार रद्द करून 6 हजार रुपये स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतले. ही बाब लक्षात येताच सदाशिव बेलगुफे यांनी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांच्या पथकाने संशयितांबाबत गोपनीय माहिती काढून विजय सूर्यवंशी (वय 29, रा. पंडितनगर, सिडको, नाशिक, योगेश काळे (वय 27, रा. अबड, नाशिक), नीलेश भिडे (वय 31, रा. पिंपराळ, जि. जळगाव), अशपाक शेख (वय 30, रा. सिडको, नाशिक), देविदास शिदे (वय 28, रा. सातपूर, नाशिक), लक्ष्मीकात पाटील (वय 50, रा. चेतना नगर, नाशिक) या सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी लोणंद, फलटण, बारामती, जेजुरी परिसरात देखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.      
त्यांच्याकडून विविध बँकेचे एटीएम कार्ड आणि 1 लाख 32 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या संशयितांनी पुणे, नगर जिल्ह्यासह राज्यातील सहा ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक मारूती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत जाधव, पोलीस नाईक अतुल कुंभार, संतोष जाधव आदींनी या कारवाईत भाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: