Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही
ऐक्य समूह
Wednesday, December 05, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
सुषमा स्वराज यांच्यानंतर उमा भारतींची घोषणा
5भोपाळ, दि. 4 (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे निवडणुकीऐवजी राम मंदिर निर्माण आणि गंगा नदीच्या स्वच्छतेवर सर्व लक्ष केंद्रित करणार असल्याची घोषणा उमा भारती यांनी आज केली. या दोन्ही दिग्गज नेत्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या तोलामोलाचे उमेदवार निवडण्याचे आव्हान भाजपसमोर राहणार आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 15 दिवसांपूर्वी केली होती. मात्र, पक्षाच्या आदेशावर आपला अंतिम निर्णय अवलंबून राहील, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उमा भारती यांनीही तसाच निर्णय घेतल्याने भाजपच्या   गोटात चिंतेचे वातावरण आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मी या निर्णयाबाबत 2016 मध्ये चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मला राजीनामा देण्यापासून रोखले होते. हा निर्णय मी पुन्हा घेतला असला तरी माझा अंतिम निर्णय पक्षावर अवलंबून असेल. पुढचे दीड वर्ष राम मंदिराची उभारणी आणि गंगेच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याचा माझा मानस आहे, असे उमा भारती यांनी भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, त्याचा अर्थ असा नव्हे की, मी राजकारणातून संन्यास घेतला आहे. संन्यास घेणे, ही वेगळी बाब आहे. मला राजकारणातून कोणीही जबरदस्तीने निवृत्त करू शकत नाही. मी भाजपमध्येच राहून पुढील काम करत राहीन, असे त्या म्हणाल्या.उमा भारती यांनी ट्विटरच्या माध्यमातून राम मंदिराबाबत मतप्रदर्शन केले आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. त्यात फायदा-तोट्याचा विचार करता येणार नाही. हा विषय आंदोलनाने नाही तर चर्चेतून सोडवायला हवा. राम मंदिराबाबत अध्यादेश आणायचा असेल तर काँग्रेसलाही त्यास पाठिंबा द्यावा लागेल. काँग्रेसने जबाबदारीने वागायला हवे. काँग्रेसनेच राम मंदिरावरून वातावरण गढूळ केले आहे, असा आरोप उमा यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: