Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्ज परतफेडीची विजय मल्ल्याची तयारी
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: na3
ब्रिटिश दलालाच्या पदार्पणामुळे धाबे दणाणले
5लंडन, दि. 5 (वृत्तसंस्था) :  भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने या कर्जाचे मुद्दल फेडण्याची तयारी दर्शवली आहे. ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मायकेलचे संयुक्त अरब अमिरातीकडून भारताकडे प्रत्यार्पण झाल्याने मल्ल्याचे धाबे दणाणले आहेत. मी घेतलेले कर्ज म्हणजे भारतीय लोकांचा पैसा आहे. माझी मुद्दल फेडायची तयारी आहे. मात्र, मी व्याज देऊ शकत नाही. कृपा करून बँकांनी माझा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती मल्ल्याने केली आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात लंडनच्या न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असल्याने तो अगतिक झाला आहे.
भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेला किंगफिशर एअरलाइन्सचा सर्वेसर्वा विजय मल्ल्या
मार्च 2016 पासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर असून त्याला देशात परत आणण्यासाठी प्रर्त्यापणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. इंग्लंडच्या उच्च न्यायालयात त्याच्यावर खटला सुरू आहे. त्याची काही खाती गोठवण्याची परवानगीही भारतीय बँकांना इंग्लंडमधील न्यायालयाने दिली आहे. ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मायकेलचे संयुक्त अरब अमिरातीकडून भारताकडे प्रत्यार्पण झाल्याने मल्ल्या हादरला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याचीही लवकच सुनावणी होणार आहे. त्यात हे प्रकरण अंगलट
येईल, अशी भीती असल्याने मल्ल्या नरमला आहे. कर्जाचे 100 टक्के मुद्दल फेडण्याची तयारी त्याने दाखवली असून त्याबाबत ट्विट
केले आहे. कर्ज फेडण्याची तयारी मी कर्नाटक उच्च न्यायालयात आधीच दर्शवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होते. त्यामुळे
बँकांनी आणि सरकारने माझा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती त्याने केली आहे.
कर्जफेड न करण्याची कारणेही मल्ल्याने ट्विटमध्ये स्पष्ट केली आहेत. विमानांच्या इंधनाचे दर चढे होते. त्यामुळे किंगफिशर
एअरलाइन्सच्या व्यवसायावर परिणाम होत होता. हा व्यवसाय वाढवण्यासाठी मी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, एअरलाइन्सचे दिवाळे निघाल्याने मला प्रचंड तोटा झाला. कर्जाचे सगळे पैसे नुकसानभरपाईत गेले. त्यामुळे मला कर्जाची परतफेड करता आली नाही, असं त्यानं म्हटलं आहे.
राजकीय नेते व माध्यमांवरही विजय मल्ल्यानं आगपाखड केली आहे. माध्यमांनी माझी परिस्थिती समजून न घेता मला खलनायक ठरवलं. गेली 30 वर्षे मी राज्य आणि केंद्र सरकारांना विविध प्रकारे निधी पुरवला आहे. किंगफिशरमधून नफा होत असताना मी अनेक विकासकामांनाही हातभार लावला होता. माध्यमे त्याबद्दल काहीच सांगत नाही. किंगफिशरचं दिवाळं निघालं नसतं तर मी कर्जबाजारी झालो नसतो, असे त्याने म्हटले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: