Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड येथे तीन घरफोड्यात दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि.5 : येथील कार्वे नाका परिसरात चोरट्यानी मंगळवारी रात्री तीन ठिकाणी घरफोडी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कार्वे नाका येथील शिक्षक कॉलनीमधील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे चंद्रकांत हिंगमिरे यांच्या घराचा दरवाजाचा व दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करुन कपाटातील साहित्य विस्कटून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. जाताना चोरट्यांनी हिंगमिरे यांच्याच दुकानातील साहित्य चोरून नेले. हिंगमिरे यांच्या घर व दुकानातून सुमारे 60 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. याच परिसरातील विकास जगताप यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील दागिने रोख रक्कम घेऊन कपाटातील साहित्य विस्कटून चोरटे पसार झाले. विकास जगताप हे गावी गेल्यामुळे चोरट्यांनी हा डाव साधला.
दरम्यान, चोरटयांनी अन्य तीन चार ठिकाणीही चोरीचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. चोरी करण्यापूर्वी शेजारील घरातील लोक बाहेर येवून नये म्हणून चोरटयांनी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्याचे लक्षात आल्यावर रात्रीच्या वेळी काही लोकांनी एकमेकांना फोन करून उठवलं. त्यावेळी परिसरात चोरी झाल्याची बाब समोर आली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना केल्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: