Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘सातार्‍यात फक्त माझेच चालते’ वरून उद्रेक
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: lo3
‘फाईट’ चित्रपटाच्या अभिनेत्याची गाडी फोडली
5सातारा, दि. 6 : 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रसिद्ध होणार्‍या (फाईट) या मराठी चित्रपटात ‘सातार्‍यात फक्त माझेच चालते’ या डॉयलॉगवर चिडून जाऊन राहुल पाटोळे, रा. शाहूनगर याने आपल्या अन्य तीन सहकार्‍यांच्या मदतीने या चित्रपटातील अभिनेता जीत मोरे यांची इनोव्हा गाडी क्र. एमएच 14 इपी 7986 ची पाठीमागील काच फोडली. चित्रपटाच्या प्रमोशनचा बॅनर फाडला. ही घटना आज दुपारी 2 वाजता हॉटेल राधिका पॅलेसच्या आवारात घडली. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यााचे पो. नि. किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी येवून 3 जणांना ताब्यात घेतले आहे, मात्र तक्रारीअभावी सोडून देण्यात आले.
फाईट या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी दिग्दर्शक जीमी मोरे यांनी दुपारी 1 वाजता हॉटेल राधिका पॅलेस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषद संपत असतानाच राहुल पाटोळे, रा. शाहूनगर हा आपल्या अन्य 3 सहकार्‍यांसह हॉटेल राधिका पॅलेसच्या आवारात आला. त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या अभिनेते जीत मोरे यांच्या इनोव्हा गाडी क्र. एमएच 14 इपी 7986 ची पाठीमागील काच फोडली. शेजारी प्रमोशनचा लावण्यात आलेला बॅनरही फाडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
माध्यामांच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुल पाटोळे म्हणाले, फाईट या चित्रपटात एका प्रसंगात अभिनेत्याने ‘सातार्‍यात फक्त माझेच चालते’ असा डॉयलॉग मारला आहे.
त्याचा निषेध म्हणून गाडीची काच फोडली. सातार्‍यातच नव्हे तर महाराष्ट्रात फक्त खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचेच चालते, ही वस्तुस्थिती असताना सातार्‍यात फक्त माझेच चालते, हा डॉयलाग कशासाठी? भविष्यकाळात चित्रपटातील हा डॉयलॉग काढून न टाकल्यास महाराष्ट्रभर हा चित्रपट चालू देणार नाही, असा इशाराही त्याने यावेळी दिला. तोडफोडीच्या घटनेची माहिती दिग्दर्शक जीमी मोरे, अभिनेते जीत मोरे यांच्याकडून समजताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. किशोर धुमाळ घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेवून राहुल पाटोळेसह तीन जणांना ताब्यात घेतले. मात्र दिग्दर्शक, अभिनेते यांनी आम्हाला तक्रार द्यायची नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: