Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

चेतेश्‍वर पुजाराचे मालिकेतील तिसरे शतक
ऐक्य समूह
Friday, January 04, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: sp1
कांगारूंची दमछाक; भारत मजबूत स्थितीत
5सिडनी, दि. 3 (वृत्तसंस्था) : सिडनी मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशीच दमदार मजल मारली. चेतेश्‍वर पुजाराचे मालिकेतील तिसरे शतक आणि नवोदित सलामीवीर मयांक अग्रवालची दुसरी अर्धशतकी खेळी यांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर 4 बाद 303 अशी मजबूत धावसंख्या उभारली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्‍वर पुजारा 130 तर नवोदित हनुमा विहारी 39 धावांवर नाबाद होता. कांगारुंच्या गोलंदाजांनी आज चार बळी घेण्यात यश मिळवले असले तरी पुजारा, अग्रवाल व हनुमा विहारी यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली.
भारताचा कर्णधार विराट कोहलीला नाणेफेकीने आज पुन्हा साथ दिली. नाणेफेक जिंकल्यावर कोहलीने अपेक्षेप्रमाणेच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मेलबर्न कसोटीतून बाहेर ठेवलेल्या सलामीवीर लोकेश राहुलला पुन्हा एक संधी देण्यात आली. मात्र, सिडनीतही तो अपयशी ठरला. तो अवघ्या 9 धावांवर बाद झाला. मात्र, दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने 112 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. लोकेश राहुल बाद झाल्यावर अग्रवाल व पुजारा यांननी शतकी भागीदारी केली. भारताची नवी ‘द वॉल’ म्हणून पुढे येत असलेल्या चेतेश्‍वर पुजाराने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने 16 चौकारांच्या मदतीने 130 धावांची खेळी सजवली. विराट कोहली (23) व अजिंक्य रहाणे (10) हे लवकर बाद झाले. मात्र, पुजारा आणि हनुमा विहारी या जोडीने पाचव्या विकेटसाठी 75 धावांची नाबाद भागीदारी रचून भारताला दिवसअखेर तीनशेची मजल गाठून दिली. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने दोन गडी बाद करण्यात यश मिळवले. या मालिकेत भारतीय फलंदाजांची डोकेदुखी ठरत असलेल्या ऑफस्पिनर नॅथन लॉयनला फक्त एक बळी मिळाला. या कसोटीसाठी भारताने अनफिट आर. अश्‍विनऐवजी कुलदीप यादवला आणि मायदेशी परतलेल्या रोहित शर्माच्या जागी लोकेश राहुलला संदी दिली. ईशांत शर्माही किरकोळ जखमी असल्याने त्याला वगळण्यात आले. त्यामुळे या कसोटीत भारताकडे जसप्रीत बूमराह व मोहम्मद शमी हे दोनच वेगवान गोलंदाज आहेत. सिडनीची खेळपट्टी तिसर्‍या दिवसापासून फिरकीला साथ देते. त्यामुळे भारताने रवींद्र जडेजा व कुलदीप या दोन फिरकीपटूंना स्थान दिले.
चेतेश्‍वर पुजाराचा विक्रम
या मालिकेत पुजाराने पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या सामन्यात शतक ठोकले. याबरोबरच पुजाराने दिग्गज कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. गावसकर यांनी 1977-78 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात एकाच मालिकेत तीन शतके ठोकली होती. असा पराक्रम भारताच्या फलंदाजाने प्रथमच केला होता. त्यानंतर 2014-15 च्या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकच मालिकेत चार शतके ठोकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन भूमीत तीन शतके ठोकणारा पुजारा हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
कोहलीने मोडला सचिनचा विक्रम
या कसोटीत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. सिडनी कसोटीत कोहली मोठी खेळी करू शकला नाही. तो केवळ 23 धावांवर बाद झाला. मात्र, कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील 19 हजार धावा विक्रमी वेगाने पूर्ण केल्या. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 399 डावांमध्ये हा टप्पा गाठला तर हाच पराक्रम करण्यासाठी सचिनला 432 डाव खेळावे लागले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार, 16 हजार, 17 हजार आणि 18 हजार धावांचा टप्पादेखील कोहलीनेच सर्वाधिक वेगाने पूर्ण केला आहे.
खेळाडूंनी बांधल्या दंडावर काळ्या पट्ट्या
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे गुरू रमाकांत आचरेकर सर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडावरही काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. मात्र, त्याचे कारण वेगळे होते. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बिल वॉटसन यांचे वयाच्या 87 व्या वर्षी 31 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: