Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या प्रकरणी 10 जानेवारीला पुढील सुनावणी
ऐक्य समूह
Saturday, January 05, 2019 AT 11:43 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकली असून ही सुनावणी आता 10 जानेवारी रोजी होणार आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाच्या नियमित सुनावणीबाबत योग्य खंडपीठ पुढील आदेश जारी करेल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी केव्हापासून सुरू होणार हे 10 जानेवारी रोजी निश्‍चित होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज केवळ 60 सेकंदात सुनावणी झाली. केवळ 15 सेकंदात खंडपीठाने आदेशाचे वाचन केले. यावेळी विविध पक्षकारांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे व राजीव धवन न्यायालयात उपस्थित होते. मात्र, त्यांना एक शब्दही बोलायची संधी मिळाली नाही. यापुढील सुनावणीबाबत योग्य खंडपीठ 10 जानेवारीला योग्य तो आदेश देईल, असे न्या. गोगोई यांनी स्पष्ट केले. या खंडपीठात न्या. संजय किशन कौल यांचाही समावेश होता. आता पुढील सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे या प्रकरणी नियमित सुनावणीचा निर्णय 10 जानेवारीलाच होण्याची शक्यता आहे.
राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आज तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता असली तरी अद्याप या खंडपीठाची स्थापना  सर्वोच्च न्यायालयाने केलेली नाही. याबाबतही 10 जानेवारीलाच स्पष्टता होईल. या न्यायमूर्तींची नावे 6 किंवा 7 तारखेला निश्‍चित केली जातील, असेही समजते. दरम्यान, अयोध्या प्रकरणी तत्काळ आणि दररोज सुनावणी घेण्याबाबत दाखल करण्यात आलेली जनहित याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अ‍ॅड. हरिनाथ राम यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. फार महत्त्व नसलेल्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणार्‍या याचिका न्यायालयात वारंवार दाखल होत आहेत. याबाबत न्या. गोगोई व न्या. कौल यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
अयोध्येतील वादग्रस्त 2.77 एकर भूखंडाची मालकी समप्रमाणात सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांना देण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये दिला होता. त्याला आव्हान देणार्‍या 14 याचिकांवर न्या. रंजन गोगोई आणि न्या. कौल यांच्या खंडपीठासमोर यापूर्वी 24 डिसेंबरला सुनावणी झाली होती. त्यावेळी पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी होईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे आज नियमित सुनावणी आणि खंडपीठ गठीत करण्याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: