Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नवे बसस्थानक कराडच्या वैभवात भर घालेल : रावते
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: re4
महाराष्ट्रात 98 बसस्थानकांचे काम सुरू
5कराड, दि. 7 : प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज आणि सर्वसोयींनी युक्त बसस्थानक शासनाच्या निधीतून कराडमध्ये बांधण्यात आले आहे. हे बसस्थानक कराडच्या वैभवात भर घालेल. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रात 98 बसस्थानकांचे काम सुरू आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्तबांधण्यात आलेल्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचेमाजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ.  बाळासाहेब पाटील, आ.  आनंदराव पाटील, महा-मंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरे, कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.
रावते म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राज्यात 113 बसस्थानकांना संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. 85 प्रवासगृहांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांसाठी प्रयत्न असणार आहे. महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मुलांच्या शिक्षणासाठी बँकेचे कर्ज घ्यावे लागणार नाही. आता बिनव्याजी पैसे महामंडळ देणार आहे. ज्या कर्मचार्‍यांची मुले महाविद्यालयात शिकत आहेत, त्या मुलांच्या बँक खात्यात दरमहा 750 रुपये जमा करण्यात येत आहेत. अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत शालेय मुलींना प्रवासासाठी मोफत पास देण्यात येत आहेत.
खा. उदयनराजे म्हणाले, सर्वसामान्यांचा आजही एसटी महामंडळावर विश्‍वास आहे. प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधांमध्ये वाढ करावी. शासनाने शिवशाही बससेवा उपलब्ध करुन दिली. हा चांगला निर्णय आहे. कराडसारखे सुसज्ज बसस्थानक सातारा येथे व्हावे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त या बसस्थानकासाठी निधी देण्यात आला होता. या निधीतून ही वास्तू तयार झाली आहे. या बसस्थानकात प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, सर्व-सामान्यांना घरापर्यंत, गावापर्यंत पोहोचवण्याचे काम एसटी करते. उद्योग, शिक्षणाच्या सुविधा असणारे कराड शहर आहे. यात्रा कालावधीत या बसस्थानकात गर्दी असते. अशा वेळी गाड्यांच्या फेर्‍या वाढवाव्यात. नवीन चांगले बनस्थानक झाले आहे. आता अधिकारी, कर्म-चार्‍यांनी नव्या उमेदीने प्रवाशांना सेवा द्यावी.
आ. आनंदराव पाटील, श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
कोण अमित शहा?
या कार्यक्रमानंतर दिवाकर रावते यांना पत्रकारांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, कोण अमित शहा? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. भाजपचे अध्यक्ष असे म्हणतात, हो का, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: