Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात मंगळवार ठरला आंदोलन डे
ऐक्य समूह
Wednesday, January 09, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यातील दुसरा मंगळवार सातार्‍यासाठी आंदोलन डे ठरला. आपल्या विविध मागण्यांसाठी काही संघटनांनी मोर्चे काढले तर काही संघटनांनी धरणे आंदोलन करीत घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. देशव्यापी संपाच्या अनुषंगाने ही आंदोलने करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, की रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना व नोकर भरती करा, कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करा, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन रुपये 1800 लागू करा, शेतमजूर, शेतकरी आणि असंघटित कामगारांना 600 रुपये पेन्शन द्या, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवून त्यांना मजबूत करा, कंत्राटीकरण बंद करून नोकरीत कायम करा, बोनस लागू होण्यासाठी पात्रतेवरील कमाल मर्यादा रद्द करा, रेशन व्यवस्था मजबूत करा, कामगार कायद्यांमधील मालक धार्जिणेबदल रद्द करा, कामगार संघटनांची नोंदणी 45 दिवसांत करा, रेल्वे विमा व संरक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला प्रवेश नको आदी मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून शेतकरी आणि कामगारांनी आंदोलन केली, अद्याप मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्या मान्य कराव्यात यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
माणिक अवघडे, अंजलीताई महाबळेश्‍वरकर, वसंत नलावडे, आनंदी अवघडे, युवराज गोडसे आदी उपस्थित होते.
पोस्ट कर्मचारी संपावर
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, रिक्त जागा भराव्यात, सरकारी कामांचे खाजगीकरण रद्द करा, सरकारी कर्मचार्‍यांना 5 प्रमोशन द्या, 7 व्या वेतन आयोगाच्या मिनिमम वेतन द्यावे, पाच दिवसांचा आठवडा लागू करा, एमएसीपी प्रमोशनसाठी व्हेरी गुड शेरा बंद करा आदी मागण्यांसाठी सातारा पोस्ट विभागाच्या कर्मचार्‍यांनी 8 आणि 9 जानेवारी रोजी होणार्‍या संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आर.आर. कुलकर्णी, मोहनराव विभूते, रवींद्र काळगे, संभाजीराव निकम, सतीशराव फडतरे, सुनील क्षीरसागर आदी उपस्थित होते.
केमिस्ट संघटनेचे हल्लाबोल आंदोलन
ऑनलाइन औषध विक्री विरोधात सातारा डिस्ट्रिक्ट केमिस्ट्र आणि ड्रगिस्ट असोसिएशन, सातारा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की ऑनलाइन औषधं ही समाजाच्या हिताची नसून त्यामुळे होणारे दुरुपयोग टाळण्यासाठी केमिस्ट संघटनेने आज मूक मोर्चा काढला आहे. ऑनलाइन औषधांसाठी केद्र सरकार प्रस्तावित अधिक सूचनेचा मसुदा घेऊन येतो आहे. चेन्नई उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाइन औषध विक्री बंद करावी असा आदेश दिला आहे. परंतु सरकारने त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. प्रस्तावित अधिसूचना मसुदा करताना संघटनेचे मत जाणून घ्यायला हवे. सध्या केलेला प्रस्तावित अधिसूचना मसुदा रद्द करण्यात यावा यासाठी आज जिल्ह्यातील 2000 औषध विक्रेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
जिल्हा परिषद कार्यालयासमोर
अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
मान्य केलेली 1500 रुपये मानधन वाढ त्वरित द्यावी, सेविका, मदतनीस यांना शासकीय कर्मचारी  म्हणून दर्जा द्या, महागाईप्रमाणे अंगणवाडी भाडेदर वाढवून द्यावा, अंगणवाडीचे खाजगीकरण करू नये, एक महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी, टीएचआर बंद करावा, वर्षातून 15 दिवसांची आजारीपणाची रजा द्यावी, या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. अंजलीताई महाबळेश्‍वरकर, आनंदी अवघडे, अनिता चव्हाण, प्रतिभा भोसले यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन
शेतीसाठी प्रतिवर्षी हेक्टरी 25000 रुपये अनुदान द्यावे, सर्व कृषी निविष्ठांना जीएसटीमधून वगळावे या मागणीसाठी भारतीय किसान संघाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी 23 हजार कोटी रुपये देण्यात आले आहे असे सरकारने जाहीर केले आहे.परंतु त्याचा लाभ शेतकर्‍यांपेक्षा बँकांना झाला. सुमारे 33 टक्के शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा झाला नाही. शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के अधिक हमीभाव देण्याची घोषणा अंमलात आणण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी व्यापार्‍याकडून लुटला जातो आहे. जीएसटी संकल्पनेनुसार शेतकरी हा अंतिम उपभोक्ता नाही. त्यामुळे कृषी निविष्ठांना जीएसटीमधून वगळावे तसेच शेतीसाठी प्रतिवर्षी हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.आंदोलनात राजेंद्र पवार, सर्जेराव जाधव, रमेश चव्हाण, विनायक डिगळे, विनायक पाटील, गोरख जाधव, महेश सावंत आदी सहभागी झाले होते.
सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका
सेविका संघाचे धरणे आंदोलन
आपल्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाने धरणे आंदोलन केले.
निवेदनात म्हटले आहे, की हंगामी व मानधनावर काम करणार्‍यांना नियमित करून त्यांना कायम कामगारांप्रमाणे वेतन द्यावे, केंद्रीय सरकारने जाहीर केलेली सेविका 1500 आणि मदतनीस 750 , मिनी अंगणवाडी 1250 रुपये वाढ फरकासह तातडीने द्यावी, मिनी अंगणवाडीताईंना नेमणुकीपासून फरकासह मोठ्या अंगणवाडीचे मानधन मिळावे, मदतनीस यांना सेविकेच्या 75 टक्के मानधन ऑक्टोबर 2017 पासून फरकासह मिळावे, सेवानिवृत्तीनंतर सेविकांना 3 लाख आणि मदतनीस यांना 2.25 लाख रुपये एकरकमी पेन्शन करावी आदी मागण्यांसाठी आज आंदोलन केले.  सुजाता रणवरे, शौकत पठाण, वैशाली देवकर, अर्चना अहिरेकर, विमल चुनाडे आदी सहभागी झाले होते.
रिक्षा चालक-मालकांना
न्याय देण्याची मागणी
शासनाने 16 वर्ष पूर्ण झालेल्या टो रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करू नये असे काढलेले परिपत्रक रद्द करून रि पासिंगचा नियम लागू करून न्याय द्यावा, अशी मागणी रिक्षा चालक- मालक आणि भारिप बहुजन महासंघाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रिक्षा चालकांनी 20 वर्षाचा टॅक्स भरलेला आहे. त्यामुळे त्यांना 16 वर्षाची अट शिथिल करून ती 20 वर्षाची करण्यात यावी.20 वर्षांनंतर इतर वाहनांना इतर वाहनांना रि पासिंगची तरतूद लागू केली आहे. तिच तरतूद रिक्षाला करण्यात यावी. नंतर टप्याटप्याने रिक्षा व्यावसायिकांना सुलभ कर्जाची योजना तयार करून त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन नवीन वाहन खरेदी करण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, संजय साळुंखे, माजीद सय्यद उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: