Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेसह अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप
ऐक्य समूह
Wednesday, January 09, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
कामाठीपुरा येथील नागरिकांचे शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
5सातारा, दि. 8 : गोडोली येथील संचित हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली प्रसाद शिंदे (वय 27) आणि अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मंगळवारी दुपारी कामाठीपुरा येथील नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर नातेवाइकांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन पोलीस ठाण्यास दिले.
कामाठीपुरा, गोडोली भागातील वैदूवाडी येथे दीपाली  शिंदे यांचे माहेर आहे. बाळंतपणासाठी माहेरी आल्यानंतर त्यांच्या नावाची नोंदणी नातेवाइकांनी गोडोली येथील संचित हॉस्पिटलमध्ये केली. या ठिकाणी डॉ. अपर्णा जगताप यांनी दीपाली यांच्यावर उपचार सुरू केले होते. दि. 25 डिसेंबर रोजी दीपाली यांना ताण आल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉ. जगताप यांनी युरिन टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये जाण्यास सांगितले. सदर तपासणीचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगत ताप कमी होण्याच्या गोळ्या दीपाली यांना दिल्या. तीन दिवस औषधे खाल्ल्यानंतरही दीपालीचा ताप कमी होत नव्हता. दि. 29 रोजी जास्तच ताप आल्याने दीपाली यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉ. जगताप गावाला गेल्याचे सांगत त्या ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी दीपाली यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दीपाली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत डॉ. जगताप यांना फोन करत पुन्हा  त्याच ठिकाणी नेण्यास सांगितले. त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत डॉ. जगताप या हॉस्पिटलमध्ये येवून थांबल्या होत्या. तपासणी करून डॉ. जगताप यांनी दीपालीच्या गर्भात असणारे अर्भक दगावल्याचे असून रक्ततपासणी करण्यास सांगितले. रक्ततपासणी अहवालात दीपाली हिच्या शरीरात काविळीचे प्रमाण आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. हा अहवाल पाहून डॉ. जगताप यांनी दीपाली हिला मुंबई किंवा पुणे येथे उपचारासाठी नेण्यास सांगत निघून गेल्या. यांनतर दि. 30 रोजी दीपाली यांना सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी दिरंगाई केल्याच्या कारणावरून नातेवाइकांना सुनावले. तपासणी अहवाल पाहून त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी दीपाली यांना कावीळ झाल्याचे तुम्हाला सांगितले नाही का असा सवाल केला. दीपाली यांचा दि. 6 रोजी उपचारादरम्यान रात्री सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.दीपाली यांच्या मृत्यूस डॉ. अपर्णा जगताप यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाइकांनी करत मंगळवारी दुपारी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. या ठिकाणी मोठा जमाव जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी जमावाशी चर्चा करत वैद्यकीय तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नातेवाइकांना समजावून सांगितली. यानुसार संजीत आप्पाराव गुडिले (रा. 154, रा. वैदूवाडी) यांनी तशा आशयाची मागणी करणारे निवेदन
सारंगकर यांना दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: