Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रेड सेपरेटर लगतच्या टपर्‍यांचे पुनर्वसन होणार का?
ऐक्य समूह
Friday, January 11, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : सातार्‍यात बहुचर्चित ठरू लागलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम गतीने सुरू असले तरी या कामामुळे बंद पडू पाहणार्‍या अनेक टपर्‍या, छोट्या दुकानांचे पुनर्वसन होणार की नाही  याबाबत व्यावसायिकांचे सातारा पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सध्या अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन केले नाही तर कुटुंब जगवायचे तरी कसे या प्रश्‍नाने अनेकांची झोप उडाली आहे.
सातार्‍यात विशेष करून पोवई नाक्यावर सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून ग्रेड सेपरेटरचे काम मंजूर झाले, प्रत्यक्षात कामही सुरू झाले असून ते जवळपास 40 टक्के पूर्ण झाले आहे. दिवाळीपूर्वी या कामामुळे पोवई नाक्यावरून पोलीस मुख्यालयाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने कासट मार्केट परिसरात असणार्‍या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. दुकानदारांमधून नाराजी व्यक्त होताच दिवाळीच्या तोंडावर तो रस्ता सुरू  करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार त्या काळात दुकानदारांचे सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
सध्या पोवई नाक्यावर आयडीबीआय बँकेसमोर ग्रेड सेपरेटरचे काम गतीने सुरू आहे. बँकेच्या लगत पान टपरी, चहाच्या टपर्‍या, बेकरी, घड्याळ दुरुस्ती दुकान, हार- फुले विक्रेत्यांची अनेक छोटी दुकाने आहेत. काम सुरू झाल्यापासूनच  व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.  
रस्त्यावरील ग्राहक पूर्ण बंद झाला असून अडगळीतून चालत येणार्‍या ग्राहकांवरच त्यांची सध्या मदार आहे. चार पैसे मिळाले तर मिळाले नाही तर कुटुंबीयांची उपासमार अशी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. काम किती दिवस चालणार याची कल्पना नाही, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय बहरेल का नाही याची शाश्‍वती नसल्याने अक्षरशः त्यांना दिवसा चांदण्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे  पालिका प्रशासन या व्यावसायिकांच्या बाबत काय भूमिका घेणार याबाबत  उत्सुकता लागून राहिली आहे.
पुनर्वसनाची गरज नाही : उपनगराध्यक्ष
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ग्रेड सेपरेटरचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण  करण्याच्या सूचना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात आयडीबीआय बँकेसमोरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तेथील परिसरात असणार्‍या छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाची गरज भासणार नाही, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: