Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा धुव्वा
ऐक्य समूह
Thursday, January 24, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: sp1
कुलदीपचे चार बळी; धवनचे अर्धशतक
5नेपियर, दि. 23 (वृत्तसंस्था) : कुलदीप यादवचे चार बळी, मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी आणि सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या बळावर भारतीय संघाने नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून कर्णधार विल्यमसनने सर्वाधिक 64 धावा केल्या. रॉस टेलरने 34 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ केवळ 38 षटकांमध्ये 157 धावांवर गारद झाला. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मोहम्मद शामीने 3 तर चहलने 2 आणि केदार जाधवने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने दिलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने बिनबाद 41 अशी मजल मारल्यावर उपहाराची विश्रांती घेण्यात आली. त्यानंतर खेळ पुन्हा सुरू होताच प्रखर सूर्यकिरणे फलंदाजांच्या डोळ्यांवर येत असल्याने 10.1 षटकानंतर सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. खेळ पुढे सुरू झाल्यावर भारताला 49 षटकात 156 धावांचे आव्हान मिळाले.
भारताचा सलामीवीर शिखर धवनने नाबाद 75 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने 45 धावा केल्या. दुसर्‍या गड्यासाठी शिखर धवन आणि विराट कोहली या जोडीने 91 धावांची भागीदारी केली. 103 चेंडूचा सामना करताना शिखर धवनने 6 चौकार लगावले. न्यूझीलंडने दिलेले आव्हान भारतीय संघाने 34.5 षटकांतच दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले. पाच सामन्यांच्या मालिकेत आता भारतीय संघाने 1-0 ने अशी आघाडी घेतली आहे. नेपियरमध्ये आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये भारताचा हा तिसरा विजय आहे. दरम्यान, कर्णधार कोहलीला या मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: