Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा
ऐक्य समूह
Tuesday, January 29, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: sp1
5माऊंट माँगनुई, दि. 28 (वृत्तसंस्था) : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोडदौड सुरूच असून तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने यजमान न्यूझीलंडचा सात गडी राखून धुव्वा उडवला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे 3-0 अशी आघाडी आहे. तब्बल दहा वर्षांनी किवींच्या देशात भारताने मालिका विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 244 धावांचे आव्हान भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडचे तीन बळी घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी सामन्याचा मानकरी ठरला.
दरम्यान, या मालिका विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले आहेत. अशी किमया या आधी सलीम मलिकच्या पाकिस्तानी संघाने केली होती. सलीम मलिकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1994 च्या न्यूझीलंड दौर्‍यात सलग तीन एकदिवसीय सामने जिंकले होते. त्यानंतर कोणत्याही आशियाई कर्णधाराला हा पराक्रम करणे शक्य झाले नव्हते. मात्र, विराटने 25 वर्षानंतर या पराक्रमाची बरोबरी केली. न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत सलग तीन एकदिवसीय सामन्यात पराभूत करणारा विराट दुसरा आशियाई कर्णधार ठरला आहे.
न्यूझीलंडने दिलेले 244 धावांचे आव्हान स्वीकारून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. ही जोडी भारतीय डावाची चांगली सुरुवात करून देणार असे वाटत असताना धवन 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित यांनी दुसर्‍या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. डावाच्या 29 व्या षटकात रोहित 62 धावांवर बाद झाला. त्यानंतर काही धावांची भर घालून विराट (60 धावा) तंबूत परतला. मात्र, अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी डावाची अधिक पडझड न होऊ देता भारताला विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 77 धावांची अभेद्य भागीदारी रचली. रायुडूने नाबाद 40 आणि कार्तिकने नाबाद 38 धावा फटकावत विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या अंगलट आला. भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करताना यजमानांचा डाव 49 षटकांत 243 धावांवर रोखला. न्यूझीलंडने आपले पहिले तीन फलंदाज 59 धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी रचून डावाला आकार दिला. अखेर यजुवेंद्र चहलने लॅथमचा अडथळा दूर केला. टेलर एका बाजूने किल्ला लढवत असताना भारतीय गोलंदाजांनी इतर फलंदाजांना फार वेळ खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. मोहम्मद शमीने टेलरला झेलबाद केले. टेलरने 106 चेंडूत 93 धावांची खेळी साकारली. त्यानंतर किवींचा डाव 243 धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने 41 धावांत तीन बळी घेतले. भुवनेश्‍वरकुमार, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विश्‍वचषक स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: