Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टीम इंडियाचा 92 धावांत खुर्दा
ऐक्य समूह
Friday, February 01, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: sp1
न्यूझीलंडचा 8 गडी राखून दणदणीत विजय
5हॅमिल्टन, दि. 31 (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये तब्बल एका दशकानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम करणार्‍या टीम इंडियाच्या अब्रूची लक्तरे किवी गोलंदाजांनी आज वेशीवर टांगली. पहिले तीन सामने गमावल्यानंतर यजमान न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय आज नोंदवला. हॅमिल्टन येथे झालेल्या चौथ्या सामन्यात यजमान संघाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीचा अवघ्या 92 धावांत खुर्दा केला. त्यानंतर न्यूझीलंडने 8 गडी व तब्बल 212 चेंडू राखून आरामात विजय मिळवला. विजयासाठी असलेले 93 धावांचे मामुली आव्हान न्यूझीलंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. हेनरी निकोल्सने नाबाद 30 तर रॉस टेलरने नाबाद 37 धावा केल्या.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या भारतीय संघाला किवी संघाने आज ’रिअ‍ॅलिटी चेक’ दिला. या विजयासह न्यूझीलंडने भारताचे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी चेंडू स्विंग होणार्‍या मैदानावर साफ उघडी पडली. हॅमिल्टनच्या मैदानात ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक मार्‍यासमोर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अप्रतिम स्विंग गोलंदाजीवर भारतीय संघाची अक्षरशः दाणादाण उडाली. धावफलकावर केवळ 33 धावा लागल्या असताना भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यामुळे भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतील आपला नवा नीचांक नोंदवतो की काय, अशी भीती होती. मात्र, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांंनी प्रत्येकी दोन अंकी धावा कत भारतावर आलेली नामुष्की टाळली. मात्र, हे तिघेही फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. सरतेशेवटी भारताने 92 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. शिखर धवन आणि रोहित शर्मा झटपट माघारी परतले. कारकिर्दीतील 200 वा सामना खेळणार्‍या रोहित शर्माने अवघ्या 7 धावा केल्या. कोहलीच्या जागेवर स्थान मिळालेला शुभमन गिलही प्रभाव पाडू शकला नाही. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 10 षटकात 21 धावांमध्ये 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 10 षटकात 26 धावांमध्ये 3 बळी घेतले. टॉड अ‍ॅस्टल आणि जिमी निशॅम यांनी प्रत्येकी एक बळी घेत या दोघांना चांगली साथ दिली
या सामन्यात न्यूझीलंडने 8 गडी आणि 212 चेंडू राखून टीम इंडियाचा पराभव केला. प्रतिस्पर्धी संघाने चेंडू राखून विजय मिळवण्याच्या तुलनेत हा भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. भारताने दिलेले अवघ्या 92 धावांचे आव्हान न्यूझीलंडला केवळ 14.4 षटकात पूर्ण करून 212 चेंडू राखत सामना जिंकला. या आधी श्रीलंकेने भारताला 209 चेंडू आणि 8 गडी राखून पराभूत केले होते. 22 ऑगस्ट 2010 रोजी भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भारताचा डाव 104 धावात आटोपला होता. त्यापेक्षा आज झालेला पराभव अधिक मानहानीकारक ठरला. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भारताने नोंदवलेला नीचांक 88 आहे. तो टाळण्यात आज भारतीयांना यश मिळाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: