Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

अखेरच्या सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 35 धावांनी मात
ऐक्य समूह
Monday, February 04, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: sp1
5वेलिंग्टन, दि. 3 (वृत्तसंस्था): कमी धावसंख्या असतानाही भारतीय गोलंदाजांनी गोलंदाजीचे सर्वोत्तम प्रदर्शन घडवत न्यूझीलंडचा डाव 217 धावात संपवत पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 35 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांची ही मालिका 4-1 ने खिशात घातली आहे.
विराट कोहली व अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली होती. या पराभवानंतर तरी पाचव्या सामन्यात भारताचे प्रमुख फलंदाज काहीतरी सबक घेतील असे वाटले होते. परंतु चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. मात्र अंबाती रायडू आणि विजय शंकर यांच्या भागीदारीमुळे भारताला शंभरी पार करता आली. या दोघांच्या भक्कम भागीदारीमुळे न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. हार्दिक पंड्याने या सामन्यात सर्वांचीच मने जिंकली. त्याने टी-20 सामन्याला साजेसा खेळ करत 22 चेंडून 45 धावा फटकावल्या. त्यामध्ये  अनेक सुरेख चौकार आणि षटकारांचा समावेश होता. त्याने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताला 252 धावांपर्यंत मजल मारता आली. या आव्हानासमोर खराब सुरूवात झालेल्या न्यूझीलंडच्या संघाने भारतीय गोलंदाजांपुढे सपशेल हार मानली. त्यांचा संपूर्ण संघ 217 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयामुळे भारताने सलग मालिका जिंकण्याचा धडाका कायम ठेवला आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर सलामीच्या फळीने लोटांगण घातले. विराटच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या भारतीय संघाची सलग दुसर्‍या सामन्यात दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. रोहित 2, शिखर 6, शुभमन 7 आणि धोनी 7 धावांवर बाद झाल्यामुळे एकवेळ भारताची 4 बाद 18 अशी दयनीय अवस्था होती.
 त्यानंतर फलंदाजीत बढती मिळालेल्या नवख्या विजय शंकरने रायडूला साथ देत संघाचा डाव सावरला. रायडू आणि शंकर यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत धावफलक हलता ठेवला. या दोघांनी 98 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाचे शतक पूर्ण केले. पण, शंकर अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो 45 धावांवर बाद झाला. केदारने रायडूच्या साथीत अर्धशतकी भागीदारी केली. रायडू शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो 90 धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत संघाला अडीचशे पार नेले.
या आव्हानासमोर न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. निकोलसला शमीने बाद केले. त्यानंतर मुन्रोही शमीचाच शिकार ठरला. सुरूवातीला ब्रेकथू मिळवून देण्याची शमीने कायम ठेवली. रॉस टेलरचा अडथळा पंड्याने दूर केला. विल्यम्सन आणि टॉम लेथम यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. मात्र, चहलच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. धोनीने धोकादायक ठरणार्‍या निशमला धावबाद करून भारताचा विजय सुकर करून दिला. अखेर न्यूझीलंडचा डाव 217 धावांत संपुष्टात आला आणि भारताने 35 धावांनी विजय मिळविला. शमीला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: