Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फेसबुकद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍यास अटक
ऐक्य समूह
Monday, February 04, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 3 : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुक पेजवरून देणार्‍या युवकाला मुंबई पोलिसांनी आग्रीपाडा येथून ताब्यात घेतले आहे. पंकज कुंभार (रा. मालगाव, ता. सातारा), असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. कुंभारला ताब्यात घेण्यासाठी सातारा एलसीबीचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की रविवारी सकाळी सहा वाजता पंकज कुंभार नावाच्या युवकाच्या फेसबुक अकौंटवर दोन प्रकारच्या पोस्ट फोटोसह टाकण्यात आल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाचे फोटोही टाकण्यात आले आहेत. या दोन्ही पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा दौर्‍याची टिप्पणी करण्यात आली आहे.
फेसबुकवरील या पोस्टमध्ये ‘आय एम अजमल कसाब. कल अजितदादा बच गया. अब सातारामे सीएम मरेगा. 26/11 आतंकवादी हमला वैसे अब ऑपरेशन सातारा सीएम और 40 हजार लोग खलास. 4 फेब्रुवारी 2019 खंडाला, सातारा इलेक्शन दौरा,’ असा पोस्टमधील मजकूर आहे. याशिवाय आणखी एक अशाच पध्दतीची पोस्ट संबंधिताच्या अकौंटवर पडली आहे.
सातार्‍यात ही वार्ता वार्‍यासारखी पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे सातारा पोलीस गडबडून गेले. एलसीबी व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तत्काळ याची गंभीर दखल घेतली. या सर्व प्रकरणासाठी विविध चार पथके तयार करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या, मूळ गाव व त्याची माहिती यासह तो सध्या कुठे आहे? अशी त्या त्या पथकाकडे जबाबदारी सोपवण्यात आली.  सकाळी 11 पासून पोलीस सर्व माहिती घेण्यात गुंतले. फेसबुक हॅन्डलरचा बायोडाटा मिळाल्यानंतर सातारा पोलीस आणखी बुचकळ्यात पडले. कारण पंकज कुंभार हा मूळचा मालगाव, ता. सातारा येथील असल्याचे समोर आले. यामुळे स्थागुशा विभाग, सातारा तालुका पोलीस तत्काळ मालगावमध्ये पोहोचले. फेसबुकवरील फोटो काही जणांना दाखवल्यानंतर त्याला त्यांनी ओळखले. मात्र, सध्या पंकज मालगावमध्ये नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून तो कामानिमित्त मुंबई, पुणेमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी पंकज कुंभार बाबत, त्याचे कुटुंबीय व तो वापरत असलेले मोबाईल क्रमांक यासह आवश्यक असणारी माहिती घेतली. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपासाला सुरुवात केली. पंकज मुंबईत असल्याचे निश्‍चित झाल्याने सातारा एलसीबीचे एक पथक मुंबईला रवाना झाले.  दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री सातारा जिल्हा दौर्‍यावर असतानाच त्यांना जिवे मारण्यासंबंधीची धमकीचा मेसेज फेसबुकवर व्हायरल झाल्याने खंडाळामध्येही संतापाची लाट उसळली. या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी होवू लागली. मुख्यमंत्री सोमवारी सातारा जिल्हा दौर्‍यावर येणार की नाही? संशयित कोण व कुठला आहे? असे सवाल उपस्थित होवून चर्चेला उधाण आले. 
दरम्यान, सायबर क्राईम विभागाचे सहाय्यक निरीक्षक गजानन कदम व त्यांच्या सहकार्‍यांनी पंकज कुंभार याची माहिती आग्रीपाडा (मुंबई) पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या ठिकाणी छापा टाकून पंकज कुंभारला ताब्यात घेतले. मुख्यमंत्री यांच्या सभेबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह वक्तव्य, पोस्ट टाकणार्‍या पंकज कुंभार यास सातारा एलसीबीने मुंबईतून ताब्यात घेतले आहे. याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सभा व्यवस्थित पार पडेल, याची संपूर्ण दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री विरोधातील ही पोस्ट फेसबुकवर पडल्याने व रात्री उशिरापर्यंत पंकज कुंभार याच्याकडे चौकशी सुरु असल्याने या ठिकाणी काही प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. फेसबुक पोस्ट टाकणारी तीच व्यक्ती आहे का? फेसबुक अकौंट हॅक झाले आहे का? ही पोस्ट कुठून टाकण्यात आली आहे? पोस्ट टाकण्यामागे हेतू काय आहे? फेसबुक अकौंट खरे आहे का? पोलीस या घटनेचा कधी व कसा पर्दाफाश करणार? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
गुन्हा दाखल करण्याबाबत प्रश्‍नचिन्ह
पंकज कुंभार याने ही पोस्ट टाकल्यानंतर त्याला सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही? गुन्हा कुठे व काय दाखल करायचा? हे चौकशीनंतर ठरवले जाणार आहे.
पोनि. विजय कुंभार,
सातारा एलसीबी

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: