Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृष्णानगर येथील घरफोडीत पावणेआठ लाखाचा ऐवज लंपास
ऐक्य समूह
Wednesday, February 06, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 : कृष्णानगर येथील अक्षय कृपा सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 25 तोळे सोने व रोख 20 हजार रुपये असा एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र रंगनाथराव फटाले (वय 48), मूळ राहणार बीड, सध्या हनुमंतराव जगदाळे यांच्या बंगल्यात 46, अक्षयकृपा सोसायटी, कृष्णानगर, सातारा हे एलआयसीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. काल रात्री 10 वाजता पत्नी रेखा आणि मुलगा श्रेयस यांच्या समवेत जेवण झाल्यानंतर झोपी गेले. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील भिंतीवरुन आवारात प्रवेश करून पाठीमागील खिडकीचा गज वाकवून रवींद्र फटाले यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. आतमध्ये अडकवलेल्या कपड्यां-मधील 20 हजार रुपये काढले. तदनंतर गजाच्या सहाय्याने कपाट तोडले.    
आतमध्ये असलेले सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, हार, लॉकेट असे 22 तोळे सोने एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आज सकाळी फटाले कुटुंबातील सदस्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस जाऊन पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून चोरी केल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांचे एक पथक श्‍वान पथकासह दाखल झाले. श्‍वान पथक बंगल्याजवळच घुटमळले. एस. वाय. भोसले व त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा केला. याच अज्ञात चोरट्यांनी परिसरात असणार्‍या घरातल्या खिडकीतून मोबाईल लंपास केल्याची चर्चा सुरू होती.
माहिती घेऊन चोरी ?
हणमंतराव जगदाळे यांच्या बंगल्यातील खालील रुममध्ये फटाले कुटुंबीय भाड्याने राहत आहेत. पैसे आणि सोन्याचा ऐवज असलेल्या रूममधून चोरी झाली. चोरट्यांनी दुसर्‍या कोणत्याही रुममध्ये जाण्याची तसदी घेतली नाही. यावरून माहिती घेऊन ही चोरी केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
दोन दिवसांपूर्वी आणखी एक प्रयत्न
कृष्णानगर परिसरात असणार्‍या हणमंत जगदाळे यांच्या बंगल्याच्या समोर असणार्‍या मारुती दहिदुले यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या मारुती सुझुकी नंबर (एमएच 11 वाय 1139) ची काच उघडून चोरीचा प्रयत्न झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: