Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
ऐक्य समूह
Wednesday, February 06, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 5 : गेल्या काही वर्षांमध्ये विविध निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले असतील तर त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. डोळ्यासमोर सत्ताबदल हे ध्येय ठेवूनच प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यात मित्रपक्षाकडून न्याय मिळाला नाही हे खरे असले तरी आपल्यापुढे भाजपरुपी मोठा पक्ष शत्रू म्हणून उभा आहे. त्याला रोखणे आवश्यक आहे. देशपातळीवर 22 पक्ष एकत्र आले असून आगामी निवडणुकी-मध्ये नरेंद्र मोदींना बहुमत मिळणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील काँग्रेस कमिटीच्या पाठीमागील मैदानावर सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  
आ. मोहन कदम, हिंदुराव नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, सौ. रजनी पवार, विजयराव कणसे, मनोहर शिंदे, सुनील काटकर, धनश्री महाडिक, विराज शिंदे, प्रताप देशमुख, बाबासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. फक्त मराठवाड्यातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील माण-खटावमध्ये तीच परिस्थिती आहे. जनावरांच्या छावण्या सुरु करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष दुष्काळी भागात मते मागण्यास गेल्यास जनता त्यांना उभी करणार नाही. देशामध्ये सध्या भाजप हे मोठे संकट आहे. बुरसटलेल्या विचारांचे संकट आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांनी घडवलेला महाराष्ट्र आज एकसंध राहिलेला नाही. पैसेवाल्यांना देशाची घटना उद्ध्वस्त करायची आहे. पंतप्रधान फक्त घोषणा करीत आहेत प्रत्यक्षात काहीही होत नाही. सातारा जिल्ह्याने देशात वैचारिक नेतृत्व केले आहे. महाराष्ट्रात जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची जबाबदारी आता वाढली आहे. त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन मेळावे घ्यावेत. आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील यांना बोलवावे. तालुकास्तरीय मेळावे झाल्यानंतर जिल्ह्याचा एक मोठा मेळावा आपण आयोजित करून तो यशस्वी करू. जिल्ह्यामध्ये काँग्रेस सक्षम करावी लागणार आहे. त्यासाठी आपापसातले मतभेद मिटवले पाहिजेत. काँग्रेस बळकट करण्यावर मी अधिकाधिक भर देणार आहे. भविष्यकाळात आपण राफेलमधील भ्रष्टाचार, शेतकर्‍यांची झालेली फसवणूक आणि भाजप सरकारने केलेल्या घोषणांचा फार्स उघड करणार असल्याचेही आ. चव्हाण यांनी सांगितले. आ. जयकुमार गोरे म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनापासून ठरवलं तर जिल्ह्यामध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरू शकतो. राष्ट्रवादीचा पराभव होऊ शकतो, हे आमदार मोहन कदम यांच्या विजयानंतर स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस खर्‍या अर्थाने वाढवायची असेल तर वाडी-वस्ती, गावपातळीवर मोठे संघटन उभे करण्याची गरज आहे. मुळात आपले युद्ध कोणाशी आहे, हे जोपर्यंत कार्यकर्त्यांना कळत नाही तोपर्यंत काँग्रेस उभारी घेऊ शकत नाही. आघाडीबाबत आमची भूमिका स्पष्ट असली तरी मित्र पक्षाने आमच्याशी नेहमीच प्रतारणा करण्याची भूमिका घेतली आहे. आघाडी करताना आमचा स्वाभिमान जपला जातोय का याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्याचे राजकारण करत असताना जिल्हा परिषद, जिल्हा बँक या दोन्ही संस्था आपल्या ताब्यात कशा येतील यादृष्टीने कामाला लागण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये ना गोरे गट, ना नाना गट आहे, आम्ही सर्वच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आनंदराव पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपला झंजावात दाखवून दिला आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला कोणीही रोखू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ घोषणा केल्या. प्रत्यक्षात काहीच केले नाही. उलट मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण असताना त्यांनी राज्याच्या विकासाचा आलेख उंचावण्याचे काम केले. काँग्रेसची प्रतिमा वाढवण्याचे काम केले. बाबांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात फार मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, अध्यक्षपदाच्या जबाबदारीची जाणीव मला आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांशी चर्चा करून जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतले जातील. प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी आमची तयारी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात, वाडी-वस्तीवर संघटन करून पक्षाची विचारधारा सर्वांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. ही सभा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पुढील सभा जिल्हा परिषदेच्या मैदानावर घेतली जाईल. न भूतो न भविष्यती अशी सभा होईल. सत्तेच्या विरुद्ध संघर्ष करताना प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: