Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सोनिया गांधी यांच्याकडून बाक वाजवून नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक
ऐक्य समूह
Friday, February 08, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. लोकसभेत गडकरींच्या कामाची वाहवा करताना सोनिया यांनी चक्क बाक वाजवून गडकरींच्या कार्याला दाद दिली. लोकसभेत गडकरींकडे असलेल्या खात्यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरील उत्तरादरम्यान खासदार सिंग यांच्या ‘वंडरफुल्ल’ शब्दाचा उल्लेख येताच सोनिया गांधी यांनी दाद देत गडकरींचे कौतुक केले.
नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचा पदभार आहे. त्यानुसार, देशातील दळणवळण सुविधा आणि रस्ते बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे, लोकसभेत रस्ते मंत्रालयाकडून झालेल्या कामासंदर्भात आणि देशात सुरू असलेल्या कामासंदर्भातील प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना गडकरींना देशातील सर्वच खासदार माझ्या आणि माझ्या मंत्रालयातील कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले. या सर्वच खासदारांच्या मतदारसंघात सध्या रस्ते बांधणीची कामे सुरू असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. त्यावेळी, भाजप खासदारांनी गडकरींच्या उत्तराने समाधान व्यक्त करत लोकसभेत बेंच वाजवून त्यांना समर्थन दिले.
मध्य प्रदेशचे भाजप खासदार गणेश सिंग यांनीही यावेळी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. केंद्रीय दळणवळणमंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाकडून ‘वंडरफुल’ काम सुरू असल्याचे त्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना सांगितले. त्यावेळी, हे सर्व बारकाईने ऐकणार्‍या खासदार सोनिया गांधी यांनी हळूवार स्माईल देत बाक वाजवून गडकरींच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनिया गांधी यांचे अनुकरण करत गडकरींच्या कामाचे बाक वाजवून कौतुक केले.   
दरम्यान, सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांच्या समस्येबाबत नितीन गडकरींना लक्ष घालण्याचे सुचवले होते. त्यानंतर, रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लावल्याबद्दल नितीन गडकरींना पत्र लिहून सोनिया गांधींनी आभार व्यक्त केले होते. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हे पत्र सोनिया यांनी लिहिले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: