Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगावच्या आरफळ कॉलनीतील जुगार अड्ड्यावर छापा
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: re2
दहा जणांविरोधात गुन्हा; एक लाखाचा ऐवज जप्त
5कोरेगाव, दि. 8 : शहरातील आरफळ कॉलनी परिसरात बोरीचा माळ नावाच्या शिवारात एका खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी दुपारी तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 7 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की आरफळ कॉलनी परिसरात तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक छापा टाकून प्रताप बर्गे, शिवलिंग बर्गे, रमेश बोतालजी, पुरुषोत्तम बर्गे, संतोष बर्गे, दत्तात्रय नाळे, सिकंदर हकीम, अजमुद्दीन मुल्ला, दत्तात्रय मलकमीर, दीपक माने यांना जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 7 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी पोलीस नाईक उदयसिंह जाधव यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा जणांना अटक करुन, जामिनावर मुक्तता करण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: