Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आळजापूर येथे धोम-बलकवडी कालवा फुटल्याची अफवा
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 8 : आळजापूर, ता. फलटण येथे धोम-बलकवडी कालवा फुटून नुकसान झाल्याच्या अफवेने सर्वत्र तोच एक चर्चेचा विषय झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कालवे पूर्ण नसल्याने दुष्काळी पट्ट्यात जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याचे पाणी व चारा पिकासाठी कालव्याला छोटे भगदाड पाडून पाणी ओढ्यात सोडण्यात आले आहे.
धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पाण्याद्वारे गेल्या तीन चार वर्षांपासून खंडाळा व फलटण तालुक्यात कायम दुष्काळी पट्ट्यात या प्रकल्पाचे पाणी ओढ्या नाल्याद्वारे सोडून दुष्काळी जनतेला  आधार देण्यात आला आहे. या वर्षी प्रकल्पातील मुख्य कालव्याचे 147 कि. मी.पर्यंतचे काम पूर्ण होऊन शंभू महादेवाच्या पायथ्याशी पाणी पोहोचले आहे. यामध्ये पाटबंधारे विभाग यशस्वी झाला आहे. उपफाट्यांची कामे खंडाळा तालुक्यात पूर्ण झाली आहेत. फलटण तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण असल्याने पाण्याची उपलब्धता असूनही तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्ट्यातील गावाना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी संबंधित टंचाईग्रस्त गावातील मुख्य कालव्यालगतच्या ओढ्या-नाल्यात पाणी सोडून टंचाईवर मात
करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. अन्यथा गावोगावी जनावरांसाठी छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून
रहावे लागले असते. त्यापेक्षा ओढ्या-नाल्यातून पाणी सोडून दुष्काळी तालुक्यातील अनेक गावात केलेल्या सुविधेमुळे समाधान
व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: