Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शरद पवार उतरणार लोकसभेच्या रिंगणात?
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: mn1
शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान एका चॅनेलवर शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी ब्रेकिंग न्यूज देण्यात येत होती. त्यावरून सोशल मीडियावर राजकीय चर्चेला उधाण आले होते. या बाबतची माहिती बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समजताच त्यांनी बैठकीमधून बाहेर येत ‘शरद पवार हे निवडणूक लढवणार नाही’, असा खुलासा केला. यामुळे शरद पवार निवडणूक लढवणार नाही या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.
5पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या इच्छुकांची शुक्रवारी येथील बारामती हॉस्टेल-मध्ये बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. यावर पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितल्याने राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे.
यावेळी पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, गणेश नाईक, आनंद परांजपे आणि विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अशी विनंती विजयसिंह मोहिते-पाटील आणि जवळपास सर्व वरिष्ठ सहकार्‍यांनी केली. माझी इच्छा नाही पण विचार करू, असे आपण त्यांना सांगितल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण होते. मोदी त्यांच्यावर जसे संस्कार झाले त्याला सुसंगत ते बोलले, अशी टीकाही त्यांनी केली.
 शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची आवश्यकता नाही. माझ्याकडे 5 ते 6 प्रबळ दावेदार आहेत, असे सांगत अजित पवार यांच्या उमेदवारीवर त्यांनी पडदा टाकला. तसेच लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या जनतेची 7 महिने आधी सुटका होईल, असेही ते म्हणाले.
अण्णा हजारे यांचे उपोषण या विषयावर बोलणं, बातम्या वाचणे, पाहणे, गेली 2 वर्षे सोडून दिल्याचे सांगतानाच प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावर बोलणंही त्यांनी टाळले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍व-भूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. राज्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्या मतदारसंघांबाबत पुण्यात बैठक सुरू आहे. यात माढा, जळगाव, शिरुर, उस्मानाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. माढा लोकसभेसाठी पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार याचं चित्र आजच्या बैठकीत स्पष्ट होण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही.   
माढ्यातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते -पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी द्यायची यावर खल सुरू होता. यात आता शरद पवारांनी उमेदवारीबाबत विचार करू, असे सांगून नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.
आज खासकरून माढा, जळगाव, शिरुर, उस्मानाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. या बैठकीला शरद पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजयसिंह मोहिते- पाटील उपस्थित होते. दरम्यान, माढा लोकसभेसह आघाडीमध्ये पक्षाकडे असणार्‍या जागांवरील उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा केली असल्याची माहिती आहे.
चंद्रकांत पाटलांनी सांगितला पवारांसाठी ‘सेफ’ मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढणार या चर्चेवर महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी पवारांना हरविण्याचा दावा केला आहे तर त्यांनी शरद पवार यांच्यासाठी सेफ मतदारसंघही कोणता असेल हे सांगून टाकले आहे. यावर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून नेहमीच विविध विधानांनी चर्चेत असणार्‍या महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना माढा मतदारसंघात हरवण्याची भाषा केली आहे. कारण माढा मतदारसंघात भाजपने संघटना मजबूत केल्याचा दावाही त्यांनी केला आहे तसेच शरद पवार यांच्यासाठी बारामती हा सेफ मतदारसंघ असून तेथून ते निवडून येतील, असेही त्यांनी सुचविले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: