सोनिया गांधींचा पीएमओमध्ये किती हस्तक्षेप होता? : संरक्षणमंत्री
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:24 AM (IST)
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र यूपीएच्या कार्यकाळात सोनिया गांधी या सरकारच्या निर्णयां-मध्ये ढवळाढवळ करत होत्या त्याचे काय? असा प्रश्न संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे.
राफेल करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिलायन्सच्या अनिल अंबानी यांचा 30 हजार कोटींचा फायदा करून दिला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्याने केला आहे. इतकेच नाही तर राफेल करारात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असाही आरोप काँग्रेस नेत्यांनी अनेकदा केला आहे. लोकसभेबाहेर निदर्शनेही करण्यात आली आहेत. आता मात्र निर्मला सीतारामन यांनी या सगळ्या टीकेवरून थेट सोनिया गांधींनाच आपले लक्ष्य केले आहे.
यूपीएच्या कार्यकाळात पंतप्रधानांच्या प्रत्येक निर्णयात सोनिया गांधी यांनी ढवळाढवळ केली आहे. त्यावेळी कोणालाही ही ढवळाढवळ दिसली नाही का, असा प्रतिप्रश्न करून निर्मला सीतारामन यांनी राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप केल्याच्या टीकेला उत्तर दिले आहे. राफेल करारासंदर्भात मनोहर पर्रिकर यांना नाईलाजाने गप्प रहावे लागत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी त्यांच्या भेटीनंतर केली होती. मात्र मनोहर पर्रिकर यांनी आपण असे बोललोच नाही.
राहुल गांधी खोटं बोलत आहेत, असा खुलासा केला होता.
राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामनही खोटं बोलत असल्याची टीका केली होती. तसेच काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही राफेल कराराबाबत सगळं सत्य माहित असून सीतारामन गप्प का, असा प्रश्न विचारला होता. आता मात्र निर्मला सीतारामन यांनी या मुद्द्यावरून सोनिया गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे.