Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आघाडीत एमआयएम व मनसे नको : खा. चव्हाण
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: mn2
5पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) : लोकसभेसाठी आमची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. मात्र आम्हाला एम आय एम किंवा मनसे यापैकी कोणीही नको. आमच्या मित्र पक्षाकडूनही नको, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.
पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपूर्वीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे याबाबत चार ते पाच वेळा बैठका झाल्या आहेत. त्यांनी महाघाडीत यावे, अशी आमची इच्छा आहे. या संबंधीचा प्रस्ताव अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात आहोत. मात्र त्यासाठी त्यांना एमआयएमची साथ सोडावी लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली तरीही त्याला आमचा प्रखर विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये हे दोन्ही पक्ष आम्हाला चालणार नाहीत.
पुण्याची जागा लढवण्यावर ते म्हणाले, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू. निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे. निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत.
ते पुढे म्हणाले, मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसेच दोन वर्ष झाले तरी कर्जमाफीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना पुन्हा संप करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. सरकारची दुष्काळाची घोषणा ही केवळ कागदावरच असून टँकर, विद्यार्थ्यांची फी माफी, चारा यापैकी कोणत्याही उपाययोजना नाहीत. दरम्यान, राहुल गांधी मराठवाड्यातील नांदेडमधून लढणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात. पण ते नांदेडमधून निवडणूक लढवणार याबाबत मला तरी काही माहिती नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: