Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: mn3
स पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारच्या किमान तापमानात घट
स कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
5पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) : मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. या उलट मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.  दि. 11 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 9.9 अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
पुढील आठवड्यात विदर्भात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत घटलेले राहणार आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे 10.5, लोहगाव 13.2, अहमदनगर 9.9, जळगाव 15, कोल्हापूर 17.3, महाबळेश्‍वर 10.6, मालेगाव 14.2, नाशिक 13.2, सांगली 15.3, सातारा 11.8, सोलापूर 20.4, मुंबई 20.5, सांताक्रूझ 17.6, अलिबाग 18, रत्नागिरी 17.9, पणजी 20, डहाणू 16.7, औरंगाबाद 15.6, परभणी 19, नांदेड 19, बीड 14.8, अकोला 18.5, अमरावती 19.4, बुलढाणा 17, ब्रह्मपुरी 15.4, चंद्रपूर 15.2, गोंदिया 16.6, नागपूर 17.1, वाशिम 16.4, वर्धा 20, यवतमाळ 20़
पुण्यात पुन्हा थंडी
पुणे शहरातील तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ झाली होती. त्यामुळे दिवसा उकाडा जाणवत होता. 5 फेबुवारीला पुण्यात कमाल व किमान तापमान 32.6 व 13.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.  तसेच 6 फेब्रुवारीला अनुक्रमे 32.4 व 13.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यामुळे बुधवारी दिवसाबरोबरच रात्रीही काहीसा उकाडा जाणवू लागला होता. असे असतानाच गुरुवारी सकाळी किमान तापमानात पुन्हा घट झाली असून ते 10.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचबरोबर कमाल तापमान 27.3 अंशापर्यंत खाली आले आहे. ते सरासरीपेक्षा 3.9 अंशाने कमी होते. त्यामुळे सायंकाळची थंडी जाणवू लागली आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमान आणखी कमी होऊन ते 9 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: