अमित शहा यांच्या उपस्थितीत आज भाजपची पुण्यात बैठक
ऐक्य समूह
Saturday, February 09, 2019 AT 11:32 AM (IST)
5पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपची पुणे शहर, बारामती आणि शिरूर मतदारसंघाची एकत्रित बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी होणार आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.
तीनही लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी, बूथप्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. सकाळी साडेदहा वाजता बैठकीला प्रारंभ होईल. केंद्र सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे, विविध योजनांचा तपशील मतदारांपर्यंत पोहोचविणे, निवडणुकीचा कार्यक्रम, पक्षप्रमुखांचे मेळावे याची माहिती या बैठकीत दिली जाईल. अमित शहा, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील. या बैठकीपूर्वी पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुखांचे मेळावे घेण्यात आले. कामांच्या जबाबदार्या आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यावर सोपविण्यात आल्या असल्याचेे गोगावले यांनी सांगितले.