Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुष्काळ निवारणासाठी देवस्थानांनी दानपेट्या उघडाव्यात : खा. पवार
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: mn3
5बारामती, दि. 10 : दुष्काळ निवारणाची जबाबदारी सरकारची असली तरी देवस्थान संस्थांनीही त्याला हातभार लावावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. सध्या सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरचे उदघाटन आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची असली तरी देवस्थान संस्थांनीही हातभार लावला पाहिजे. अशा काळात देवस्थानांनी शिक्षणासारखी जबाबदारी स्वीकारावी, असा सल्ला देतानाच त्यांनी देशातील सद्यस्थितीवरही भाष्य केले. निवडणुका येतील-जातील, पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे ही भावना प्रत्येकांमध्ये असली पाहिजे. सध्या देशात काय सुरू आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. लोकशाहीत काहीही निकाल लागला तरी संस्थांवर हल्लेे होणार नाहीत याची जबाबदारी जागृत नागरिकांनी घेणे गरजेचे आहे, असे पवार यांनी सांगितले.
याच कार्यक्रमात एका नेत्याने शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवत आहेत. जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहील, अशा शुभेच्छा दिल्या. त्याचाच धागा पकडून खा. सौ. सुप्रिया सुळे यांनी आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माढ्याला पाठवतात की काय, या विचाराने आपल्या पोटात गोळा आला होता, असे बोलताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: