Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सोलापूरमध्ये पोलीस चकमकीत दरोडेखोर ठार
ऐक्य समूह
Monday, February 11, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn1
पाच दरोडेखोर फरार; पहाटेचा थरार; पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस जखमी
सूर्यकांत आसबे
5सोलापूर, दि. 10 : दरोड्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर आणि ग्रामीणचे गस्तीचे पोलीस यांच्यात धुमश्‍चक्रीनंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी असे तिघेजण जखमी झाले. सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावाजवळ एका पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचा ताफा तत्काळ घटनास्थळावर दाखल झाला. तर अंधाराचा फायदा घेऊन अन्य पाच दरोडेखोर फरार झाले. विनायक देविदास काळे (वय 30, रा. बक्षी हिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे गोळीबारात ठार झालेल्या दरोडेखोराचे नाव आहे. तर पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी विकास फडतरे आणि विक्रम दराडे, अशी दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, गेल्या तीन महिन्यांपासून पहाटे व रात्रीच्या सुमारास लांबच्या प्रवासाला निघालेल्या ट्रक्सना महामार्गावर अडवून लुटमारीच्या घटना घडत होत्या. विशेष करून चालकांकडून पैसे त्याचबरोबर गाडीतील डिझेलची चोरी करण्यात येत होती. राज्यातील आणि राज्याबाहेरील चालक किंवा क्लिनर पोलिसात तक्रार करत नव्हते. परंतु पोलिसांना याबाबतची कुणकूण लागली होती.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी विकास फडतरे आणि विक्रम दराडे, असे तिघेजण खासगी लाल रंगाच्या गाडीतून (क्र. एम. एच. 13 - ए. झेड. 1798) गस्तीसाठी निघाले होते. तेव्हा त्यांना उळे गावाजवळ पाठीमागे नंबर नसलेली व पुढे (क्र. एम. एच. 12-सीडी 3933) ही पांढर्‍या रंगाची अस्पष्ट नंबर असलेली कार रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता गाडीत त्यांना दरोड्याच्या तयारीत असलेले सहा जण दिसले. पोलिसांनी त्यातील विनायक काळे याला पकडले. त्याला गाडीत घालत असताना अन्य पाच जण विनायक काळे या दरोडेखोराला सोडविण्यासाठी गाडीजवळ आले असताना साहेब चुकलो, चुकलो असे म्हणत त्या पाच जणांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.      
त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात विनायक काळे हा दरोडेखोर गंभीर जखमी झाला. दरोडेखोरांनी पोलिसांची खाजगी गाडी फोडली होती. अन्य पाच जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. जखमी विनायकला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला.                 
 दरम्यान, सकाळपर्यंत मयत आणि फरार दरोडेखोरांची नावे समजत नव्हती. इकडे शासकीय रुग्णालयात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु दुपारच्या सुमारास मयताची बहीण माधुरी काळे शासकीय रुग्णालयात दाखल झाली. आपल्या भावाचा मृतदेह पाहताच तिने हंबरडा फोडला. सोबत अन्य महिलासुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी रुग्णालयात एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. आपल्या भावाला बेदम मारहाण करून पोलिसांनी ठरवून गोळ्या घातल्याचा आरोप करत माधुरी यांच्यासह अन्य महिलांनी थेट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे निवासस्थान गाठले. विनायकवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता, त्याला पोलिसांनी कोणत्या कारणास्तव ठार मारले याचे उत्तर मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.
सर्व महिलांना प्रवेशद्वारातच थांबविण्यात आल्याने महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले. बराच वेळ गोंधळ सुरू असताना महिलांनी सामुदायिक अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. पोलिसांची धावपळ सुरू झाल्याने कोणाला काय करायचे हेच समजेना. पोलिसांनी महिलांच्या हातातील रॉकेल आणि अन्य वस्तू ताब्यात घेऊन त्यांना बाजूला सारले. दुपारपर्यंत नातेवाईकांनी विनायकचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
मयत विनायक पोलीस परीक्षा देणार होता
पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला विनायक काळे हा पोलीस विभागाच्या परीक्षेला बसला होता आणि तो त्याचा अभ्यास करत होता. शनिवारी सायंकाळी तो घराच्या बाहेर पडत असताना आपल्याला पुण्याचे भाडे आले असून डिझेल भरायचे आहे म्हणून त्याने बहीण माधुरी हिला सांगितले होते. रात्री दहापर्यंतसुद्धा विनायक डिझेल भरून घरी न आल्याने बहिणीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. सकाळी सोशल मीडियावर विनायकचा फोटो पाहताच त्यांनी तत्काळ सोलापूर गाठले. आठ दिवसांपूर्वी ग्रामीण पोलीस घरी आले होते. त्यांनी 2 लाख रुपये आणि विनायकचा फोटो मागितला होता. विनायक सोलापूर-पुणे अपडाऊन करतो, असे आपण पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी विनायकची कशासाठी चौकशी केली ते सांगितले नाही. विनायकचा पोलिसांनी ठरवून एन्काउंटर केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
जिल्हाधिकार्‍यांशी नातेवाईकांची चर्चा 
विनायक काळे याच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांच्या संशयित गोळीबाराच्या चौकशीसाठी ठाण मांडून गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे नातेवाईकांच्या समोर आले. त्यांनी नातेवाईकांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणासंदर्भात दुपारी पोलीस अधीक्षक आणि नातेवाईकांची बैठक होवून माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईक परतले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: