Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाग्यश्री मानेची हत्या अंधश्रद्धेतून?
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: re2
5ढेबेवाडी, दि. 11 : पाटण तालुक्यातील करपेवाडीतील भाग्यश्री मानेचा खून हा अंधश्रद्धेतून दिलेला नरबळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. एकविसाव्या शतकातही अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसल्याने अघोरी कृत्ये होत आहेत. नरबळी देताना माणूस पोटच्या गोळ्याचाही विचार करत नाही. करपेवडीतील घटनेने तालुका हादरून गेला आहे.
करपेवाडी येथील भाग्यश्री मानेचा खून अंधश्रद्धेतून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हा नरळबळीचा प्रकार असेल तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना म्हणून या प्रकरणाचा उल्लेख केला जाईल. पोलिसांनी भाग्यश्रीचा पिता संतोष मानेला अटक केली आहे. या प्रकरणी कायदा आपले काम करेल. गुन्हेगारांना शिक्षा होईल; पण अंधश्रद्धेचे भूत काही लोकांच्या मानगुटीवर असल्याचे स्पष्ट आहे.
अंधश्रद्धेविरुद्ध कायदा होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा जिल्हा म्हणून आपणास अभिमान वाटतो. मात्र, अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यातून जनता सुटलेली नाही. ढेबेवाडी, तळमावले हा ग्रामीण भाग आहे.  
येथील भोळ्याभाबड्या जनतेचा भोंदूबाबा गैरफायदा घेत आहेत. अनेक कुटुंबे यातून उद्ध्वस्त झाली आहेत. अंगात आल्यावर रोग बरा करतो, धन मिळवून देतो, गरिबी घालवतो, असे सांगणार्‍या भोंदूचा सुळसुळाट आहे. लग्न जमत नाही, धंदा होत नाही, घरातील वाद, महत्त्वाचे काम होत नाही म्हणून अंगारे, धुपारे घेणार्‍यांची संख्या मोठी आहे. अंधश्रद्धेतून कोंबड्या, बकर्‍यांचे बळी दिले जात आहेत. अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाची सुटका होणार तरी कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नरबळीच्या प्रकारांमुळे समाजव्यवस्था हादरून जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन व्हायला हवे. ही मशाल मनामनात, घराघरात पेटायला हवी. भोंदूबाबांची पाळेमुळे खणून काढायला हवीत. शासनाने कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी तरच अंधश्रद्धेच्या थोंतांडांचे उदात्तीकरण थांबवता येईल.
ढेबेवाडी व आजूबाजूच्या परिसरात देवाची भीती दाखवून लोकांना लुबाडण्याचे प्रकार काही भोंदू करत आहेत. त्यांच्याकडे आठवड्यातील ठरावीक दिवशी लोकांची वर्दळ सुरू असते. या भोंदूंच्या मुसक्या आवळायला हव्यात, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: