उत्तर प्रदेशात प्रियांकांची गर्जना
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 10:58 AM (IST)
रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
5लखनौ, दि. 11 (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियांका गांधी-वड्रा यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रोड शो करत सक्रिय राजकारणात उडी घेतली. त्यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विमानतळ ते काँग्रेस मुख्यालय या 25 कि.मी. अंतराच्या रोड शोमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले पक्षाचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील सहभागी झाले होते.
हा रोड शो पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. या माध्यमातून प्रियांका गांधी यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात जणू गर्जनाच केली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार आणायची जबाबदारी मी प्रियांका गांधींवर सोपवली आहे, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या रोड शोनंतर केली. लखनौमध्ये प्रियांका गांधी यांचा आज दिवसभर रोड शो होता. यामध्ये प्रियांका, राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, राज बब्बर व अन्य काँग्रेस नेते सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशात काँग्रेस बॅकफूटवर नाही तर फ्रंटफूटवर खेळणार आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
या रोड शोमध्ये राहुल गांधींनी ठिकठिकाणी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर सडकून टीका केली. आपल्या देशाचा चौकीदार चोर आहे हे वास्तव आहे. मागील पाच वर्षात मोदींनी देशासाठी काहीही केले नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू, असे आश्वासन देणार्या मोदींनी फक्त अनिल अंबानींचा फायदा करून दिला. पाच वर्षात शेतकर्यांचे कर्ज माफ होण्याऐवजी मोजक्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. चौकीदार चोर है, अशी टीका त्यांनी पुन्हा एकदा केली.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 56 इंचाची छाती फुगवून बोलत नाहीत. त्यांची देहबोलीच बदलली आहे. त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे त्यांची देहबोलीच सांगत आहे, असा टोला लगावत राहुल गांधी यांनी मोदींची नक्कलही करून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त त्यांच्या मित्रांचा फायदा करून दिला. देशासाठी काहीही केले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, लखनौ विमानतळ ते काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयापर्यंतचा सुमारे 25 कि.मी.चा रोड शो प्रियांका व काँग्रेस नेत्यांनी केला. काँग्रेसच्या स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि लखनौतील जनतेतही रोड शोबाबत उत्साह पाहायला मिळाला. लखनौच्या रस्त्यांवर लागलेल्या प्रियांकांच्या पोस्टर्सवरून हा उत्साह स्पष्टपणे दिसून आला. या रोड शोसाठी खास बस (रथ) तयार करण्यात आली असून प्रियांका व ज्योतिरादित्य शिंदे हे नेते काँग्रेस कार्यकर्ते व जनतेशी दि. 12, 13 व 14 रोजी दररोज 12 तास संवाद साधणार आहेत. या दौर्यात प्रियांका ब्राह्मण, राजपूत या सवर्ण समाजांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यासाठी पक्षाने विशेष टीम तयार केली आहे. या टीमवर पक्षापासून दूर गेलेल्या ब्राह्मण आणि राजपूत समाजाला पक्षासोबत पुन्हा जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रियांकांनी या रोड शोपूर्वी एक ऑडिओ संदेशही जारी केला. आपण सर्व मिळून राजकारणात नवीन सुरुवात करू या, असे आवाहन त्यांनी या ऑडिओमधून जनतेला केले आहे. लखनौमध्ये काही पोस्टर्सवर प्रियांका गांधींना दुर्गेच्या रूपात दाखवण्यात आले तर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान केले होते.